जयंत पाटलांचं ‘ते’ ट्विट रिट्विट करत एकनाथ खडसेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा; राष्ट्रवादीची चाहूल

By प्रविण मरगळे | Published: October 21, 2020 08:51 AM2020-10-21T08:51:06+5:302020-10-21T08:53:35+5:30

BJP Eknath Khadse, NCP Jayant Patil News: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला! अशी टीका राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती.

Retweeting NCP Jayant Patil tweet by BJP Eknath Khadse targets PM Narendra Modi | जयंत पाटलांचं ‘ते’ ट्विट रिट्विट करत एकनाथ खडसेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा; राष्ट्रवादीची चाहूल

जयंत पाटलांचं ‘ते’ ट्विट रिट्विट करत एकनाथ खडसेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा; राष्ट्रवादीची चाहूल

Next
ठळक मुद्देएकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर खुद्द खडसेंकडून मिळाले संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर टीका करणारं जयंत पाटलांचं ट्विट खडसेंकडून रिट्विट २२ ऑक्टोबर रोजी एकनाथ खडसे शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा

मुंबई – भाजपा नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत शरद पवारांनी दिले होते, त्यानंतर आता खुद्द एकनाथ खडसेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादी प्रवेशाचे संकेत दिलेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर टीका केली होती, याला एकनाथ खडसेंनी पाठिंबा देत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं की, आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला! असा आरोप त्यांनी नरेंद्र मोदींवर केला होता, मात्र उत्सुकता म्हणजे एकनाथ खडसेंनी हे ट्विट रिट्विट केलं. त्यामुळे एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश जवळपास निश्चितच झाल्याचं दिसून येत आहे.

एकनाथ खडसे भाजपातून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी २२ ऑक्टोबर रोजीचा मुहूर्तही ठरला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे खडसेंबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ खडसे हे गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मानले जातात, परंतु मुंडे यांच्या निधनानंतर कालांतराने एकनाथ खडसेंना भाजपात डावलण्यात आलं, मागील वेळी पंकजा मुंडे यांच्या व्यासपीठावर एकनाथ खडसेंनी पक्षांतर्गत नाराजी व्यक्त केली होती. पंकजा मुंडेही तेव्हा पक्षाच्या सक्रीय कार्यातून बाहेर पडल्या होत्या. पत्रकारांनी पंकजा मुंडे यांना एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर प्रश्न केला, त्यावर पंकजा म्हणाल्या की, चर्चा चर्चा असताच जोपर्यंत सत्यात उतरत नाही, चर्चा ऐकायच्या असतात, ज्या गोष्टी घडल्याच नाहीत त्यावर भाष्य कशाला करायचं? मला वाटत नाही खडसेसाहेब पक्ष बदलण्याचा निर्णय घेतील असं त्यांनी प्रतिक्रिया दिली.

नाथाभाऊ पक्ष सोडणार नाही

भाजपचे नुकसान नुकसान होईल असे एकनाथ खडसे कधीही वागणार वागणार नाहीत. पुढील काही दिवसांमध्ये ते पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होतील. ते कुठेही जाणार नाहीत. मात्र यामुळे जे खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशाकडे डोळे लावून बसलेल्यांचा चांगलाच हिरमोड होणार आहे. खडसे प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीलाही उपस्थित होते. आणि ते नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर करण्यात येईल. अन् पुन्हा एकदा ते पक्ष कार्यात पुन्हा सक्रिय होतील असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

एकनाथ खडसेंनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. खडसेंचं भाजपच्या उभारणीत मोठं योगदान आहे. विरोधकांच्या बाजूने एकनाथ खडसे प्रखरतेने दिसत होते, पण दुर्देवाने त्यांची नोंद घेतली नाही असं त्यांना वाटतं, त्यामुळे जिथे नोंद घेतली जाईल तिथे जाण्याची भूमिका त्यांची असू शकते असं शरद पवारांनी सांगितल्यामुळे खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाले होते.

भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन एकनाथ खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर चार वर्ष ते मंत्रिमंडळाच्या बाहेर होते, विधानसभा निवडणुकीतही एकनाथ खडसेंना उमेदवारी नाकारण्यात आली, त्यानंतर विधानपरिषद जागेसाठीही खडसेंना संधी मिळाली नाही, त्यामुळे नाराज झालेल्या खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात उघडपणे भाष्य करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून एकनाथ खडसे भाजपाला रामराम करणार असल्याची चर्चा सुरु झाली.

Web Title: Retweeting NCP Jayant Patil tweet by BJP Eknath Khadse targets PM Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.