Rashmi Shukla: Who asked Rashmi Shukla to do phone tapping ?; Reply from NCP | Rashmi Shukla: रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग करायला कोणी सांगितले?; राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर

Rashmi Shukla: रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग करायला कोणी सांगितले?; राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर

मुंबई : राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग केले आणि जो अहवाल दिला, त्यात दर्शविल्याप्रमाणे अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्याच नाहीत. मात्र, शुक्ला यांना फोन टॅपिंगचे अधिकार कोणी दिले? त्यांनी कोणाची परवानगी घेतली होती का? त्यांना असे करायला कोणी सांगितले? या बाबी जास्त गंभीर आहेत. त्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. 

आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांचे पत्र माध्यमांमध्ये आल्यापासून ‘एनआयए’कडून माहिती बाहेर येणे कमी झाले आहे, असा टोला लगावत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांत कसलेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर गाडीत जिलेटिन सापडल्याचा तपास सुरू असताना, त्या विषयाला बगल देण्यासाठी फडणवीस असे वेगवेगळे विषय पुढे आणत आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. 

पाटील म्हणाले, शुक्ला यांच्या अहवालात संदीप बिष्णोई यांची बदली नवी मुंबईला होईल, असे लिहिले आहे; पण त्यांची बदली रेल्वेत झाली. विनय कुमार चौबे यांची बदली पुण्याला होणार आहे, असे लिहिले आहे. मात्र, ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागात झाली आहे. संजय कुमार ठाण्याला आयुक्त म्हणून जातील, असे लिहिले होते, त्यांची बदली झालेलीच नाही. त्यामुळे त्या अहवालात जे सांगितले आहे, तसे काहीही घडलेले नाही. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटिन ठेवल्याचे आढळले. नंतर मनसुख हिरेनची हत्या झाली. एटीएसचा तपास अंतिम टप्प्यात असताना एनआयएचे पत्र आले. आम्हाला चौकशी थांबवण्यास सांगण्यात आले. केंद्राच्या या एजन्सीने लवकरात लवकर चौकशी करावी. आमची चौकशी अंतिम टप्प्यात आलेली असताना ती थांबवण्यात आली आहे, हे आम्ही केंद्राच्या निदर्शनास आणून दिले आहे.

मूळ विषय अंबानींच्या घरासमोर जिलेटिन कोणी ठेवले हा आहे. त्या चौकशीपासून लक्ष विचलित करण्याचे काम फडणवीस जाणीवपूर्वक करीत आहेत. आता परमबीर सिंग यांचे पत्र बाहेर आल्यापासून ‘एनआयए’कडून देखील माहिती बाहेर येणे कमी झाले आहे, असे का झाले मला माहिती नाही, असा चिमटाही पाटील यांनी काढला.

फोन टॅपिंग करत असल्याने शुक्लांची बदली!
रश्मी शुक्ला या अनधिकृत फोन टॅप करत होत्या म्हणूनच त्यांना वेगळ्या प्रकारची शिक्षा देऊन बदलण्यात आले. महाविकास आघाडी सरकार बनत असताना सर्वात महत्त्वाचे जे नेते होते त्यांचे फोनसुद्धा टॅप करण्याचे उद्योग रश्मी शुक्ला यांनी केल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.    

मूळ विषय अंबानींच्या घरासमोर जिलेटिन कोणी ठेवले हा आहे. त्या चौकशीपासून लक्ष विचलित करण्याचे काम देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक करीत आहेत. - जयंत पाटील, जलसंपदामंत्री 

 

Web Title: Rashmi Shukla: Who asked Rashmi Shukla to do phone tapping ?; Reply from NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.