राजस्थानच्या स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसला काठावरचं बहुमत तर भाजपाला आशेचा नवा किरण

By प्रविण मरगळे | Published: February 1, 2021 08:16 AM2021-02-01T08:16:51+5:302021-02-01T08:19:05+5:30

राजस्थानच्या स्थानिक पातळीवर झालेल्या निवडणुकांमध्ये एकूण २९ लाख मतदार आहेत, त्यातील २२ लाख मतदारांनी यंदाच्या निवडणुकीत मतदान केले होते

In Rajasthan's local elections, the Congress has a slim majority and the BJP has a new ray of hope | राजस्थानच्या स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसला काठावरचं बहुमत तर भाजपाला आशेचा नवा किरण

राजस्थानच्या स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसला काठावरचं बहुमत तर भाजपाला आशेचा नवा किरण

Next
ठळक मुद्देएकूण ९० पंचायतीचा निकाल पाहिला तर भाजपाला १ हजार १४० जागांवर यश मिळालं आहे. तर काँग्रेस १ हजार १९७ जागांवर विजयी झालीमतांची टक्केवारी पाहिली तर काँग्रेसपेक्षा जास्त मतदान भाजपाला झालं आहेअपक्षांच्या पाठिंब्यावर आम्ही ५० पंचायतीवर काँग्रेसची सत्ता आणू, प्रदेशाध्यक्षांचा दावा

जयपूर – राजस्थानच्या २० जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकांमधील ३ हजार ३३४ जागांवरचे निकाल घोषित झाले आहेत. यातील ९० पंचायतीपैकी भारतीय जनता पार्टीला २४ पंचायतीत पूर्ण बहुमत मिळालं आहे, तर १९ ठिकाणी काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. ५ पंचायतीवर दोन्ही पक्षाला समसमान जागा मिळाल्या आहेत. याठिकाणी अपक्ष विजयी उमेदवारांची संख्या जास्त आहे. यातील अनेक अपक्षांना सोबत घेऊन काँग्रेस सत्तेचं समीकरण गाठण्याची तयारी करत आहे.

राजस्थानच्या स्थानिक पातळीवर झालेल्या निवडणुकांमध्ये एकूण २९ लाख मतदार आहेत, त्यातील २२ लाख मतदारांनी यंदाच्या निवडणुकीत मतदान केले होते, त्यात काँग्रेसला ७ लाख ८५ हजार २८२ मतं मिळाली तर भाजपाला ७ लाख ६५ हजार ३६३ मतं मिळाली, उर्वरित ६ लाख ८७ हजार २१९ मतं अपक्षांच्या पारड्यात गेली. एकूण ९० पंचायतीचा निकाल पाहिला तर भाजपाला १ हजार १४० जागांवर यश मिळालं आहे. तर काँग्रेस १ हजार १९७ जागांवर विजयी झाली आहे. अपक्ष उमेदवारांना ६९३ जागा मिळाल्या आहेत.

अपक्ष उमेदवारांनी नोखा आणि निवाई या दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत जाणं पसंत केले आहे. तर भिंडरमध्ये जनता सेनेसोबत गेले आहेत. हनुमान बेनीवाल यांच्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीला मुंडवा येथे बहुमत मिळालं आहे. मतांची टक्केवारी पाहिली तर काँग्रेसपेक्षा जास्त मतदान भाजपाला झालं आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया म्हणाले की, पक्षाने मागच्या निवडणुकीपेक्षा यंदा जास्त जागा जिंकल्या आहेत. त्याचसोबत त्यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि राजस्थानचे प्रभारी अजय माकन यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांनी दावा केला आहे की, अपक्षांच्या पाठिंब्यावर आम्ही ५० पंचायतीवर काँग्रेसची सत्ता आणू. काँग्रेसच्या रणनीतीनुसार अपक्ष उमेदवार उभे करण्यात आले होते, जे निवडणुकीत जिंकून आले आहेत. ते काँग्रेसचेच आहेत. तर भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधत म्हटलंय की, राजस्थानच्या जनतेने काँग्रेसला नाकारलं आहे. हे ९० पंचायती निवडणुकांच्या निकालावरून स्पष्ट होतं. आता बेरजेचं गणित करून काँग्रेस सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे.

लक्ष्मणगड नगरपालिकेवर सर्वांची नजर

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या लक्ष्मणगड नगरपालिकेवर सर्वांचे लक्ष लागून राहिले होते, यात काँग्रेस अपक्षांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करणार आहे, येथे एकूण ४० वार्ड आहेत. ज्यात काँग्रेस आणि भाजपाला प्रत्येकी १४ जागांवर विजय मिळाला आहे. तर ११ वार्डात अपक्ष आणि एकाठिकाणी माकपा उमेदवाराचा विजय झाला आहे.  

Web Title: In Rajasthan's local elections, the Congress has a slim majority and the BJP has a new ray of hope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.