Raj Thackeray: नारायण राणेंच्या मुख्यमंत्र्यांविरोधातील प्रक्षोभक वक्तव्यानंतर राज्यभरात राडा, राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 15:32 IST2021-08-24T15:29:50+5:302021-08-24T15:32:17+5:30
Narayan Rane News: नारायण राणे यांनी या कारवाईला शाब्दिक प्रत्युत्तर देत आपली जनआशीर्वाद यात्रा सुरूच ठेवली आहे. दरम्यान, आता या प्रकरणावर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

Raj Thackeray: नारायण राणेंच्या मुख्यमंत्र्यांविरोधातील प्रक्षोभक वक्तव्यानंतर राज्यभरात राडा, राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या प्रक्षोभक वक्तव्यानंतर राज्यात शिवसेना आणि भाजपा यांच्यात राजकीय राडा पेटला आहे. (Narayan Rane) या वक्तव्याविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर नारायण राणेंच्या अटकेसाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. तर नारायण राणे यांनी या कारवाईला शाब्दिक प्रत्युत्तर देत आपली जनआशीर्वाद यात्रा सुरूच ठेवली आहे. दरम्यान, आता या प्रकरणावर मनसेप्रमुखराज ठाकरे (Raj Thackeray) यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. ( Raj Thackeray's first reaction to Narayan Rane and Shiv Sena dispute)
राज्यात शिवसेना विरुद्ध भाजपा, शिवसैनिक विरुद्ध राणे समर्थक अशा सुरू असलेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांची आज कृष्णकुंजवर भेट झाली. भेटीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. यावेळी राज्यात जे काही सुरू आहे ते व्हायला नको होते. सर्व काही चुकीच्या पद्धतीने होत आहे, असे विधान राज ठाकरे यांनी केल्याची माहिती टीव्ही-९ या वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. दरम्यान, राज ठाकरे हे सध्यातरी या विषयावर अधिकृतपणे काही बोलणार नाहीत, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.
स्वातंत्र्य दिनी मुख्यमंत्र्यांना देशाचा कितवा स्वातंत्र्य दिन आहे हे आठवत नाही. मी जर त्या ठिकाणी असतो तर कानाखाली खेचली असती, असे विधान नारायण राणे यांनी केले होते. त्यानंतर नारायण राणेंविरोधात शिकमध्ये गुन्ह्याची नोंद झाली होती. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल केलेलं विधान हे संपूर्ण राज्याचा अपमान करणारं आहे, अशी तक्रार नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दाखल केली होती.
नारायण राणेंच्या विरोधात कलम ५००, ५०२, ५०५, १५३ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राणेंच्या विधानानं समाजात द्वेष, तेढ निर्माण होऊ शकतो, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी आशयाची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नाशिक पोलिसांनी राणेंच्या अटकेचे आदेश काढले होते. दरम्यान, राणेंना अटक करण्यासाठी पोलीस रत्नागिरीमध्ये दाखल झाले आहेत. नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या अटकेची तयारी सुरू केली आहे.