Pressure on JJP to leave from BJP Government in Hariyana after Akali Dal over farmers Issue | भाजपाला आणखी एक धक्का?; शिरोमणी अकाली दलानंतर जेजेपीवर साथ सोडण्याचा दबाव

भाजपाला आणखी एक धक्का?; शिरोमणी अकाली दलानंतर जेजेपीवर साथ सोडण्याचा दबाव

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या नाराजीमुळे जेजेपीचे प्रमुख उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला सध्या गोंधळात अडकलेहरियाणाचे शेतकरी कृषी विधेयकाविरोधात आंदोलन करत आहेतशेतकर्‍यांची नाराजी पाहून जेजेपीच्या आमदारांमध्ये बंडखोरीची ठिणगी पडली

नवी दिल्ली – कृषी विधेयकावरुन नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात असणाऱ्या एनडीएमध्ये बंडखोरी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाणात शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांची ही नाराजी पाहता भाजपाचा जुना पक्ष शिरोमणी अकाली दलाने केंद्र सरकारशी संबंध तोडला आहे. केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे.

शिरोमणी अकाली दल केंद्रातून बाहेर पडल्यानंतर आता हरियाणामध्ये भाजपाचा सहकारी पक्ष जननायक जनता पार्टी (जेजेपी) वर दबाव वाढत चालला आहे. शेतकऱ्यांच्या नाराजीमुळे जेजेपीचे प्रमुख उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला सध्या गोंधळात अडकले आहेत. हरियाणामध्ये भाजपा-जेजेपी युतीचे सरकार आहे. हरियाणाचे शेतकरी कृषी विधेयकाविरोधात आंदोलन करत आहेत. प्रत्येक गावात शेतकऱ्यांच्या पंचायती होत असून या विधेयकाविरोधात त्यांचा रोष सतत वाढत आहे.

शेतकर्‍यांची नाराजी पाहून जेजेपीच्या आमदारांमध्ये बंडखोरीची ठिणगी पडली आहे. जेजेपीचे आमदार रामकुमार गौतम यापूर्वीच उपमुख्यमंत्र्यांविरोधात वक्तव्य करत होते आणि आता टोहानाचे आमदार देवेंद्रसिंग बबली यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात दुष्यंत चौटाला यांच्या विरोधात थेट मोर्चा उघडला आहे.

शेतकर्‍यांवर लाठीचार्ज

१० सप्टेंबररोजी, कुरुक्षेत्र जिल्ह्यातील शेतकरी कृषी विधेयकाविरोधात मोर्चासाठी रस्त्यावर उतरले. यानंतर पोलिसांनी त्यांना रोखत त्यांच्यावर लाठीचार्ज केला. पोलिसांच्या कारवाईत बरेच शेतकरी गंभीर जखमी झाले. त्यानंतर विरोधकांनी शेतकऱ्यांचा आवाज दाबत असल्याचा आरोप करत सरकारवर हल्ला चढविला. हरियाणात जेजेपी भाजपासोबत सत्तेत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. त्यामुळे जेजेपी आमदारांना त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता वाटू लागली आहे. त्यात हरसिमरत यांनी आपली खुर्ची सोडल्याने दुष्यंत चौटाला यांच्यावरील दबाव वाढला आहे.

कॉंग्रेसचा हल्ला

हरियाणा आणि पंजाबमधील परिस्थिती लक्षात घेता काँग्रेसने शेतकऱ्यांचा मुद्दा उचलून धरला आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट केलं आहे, दुष्यंत जी हरसिमरत कौर बादल यांच्याप्रमाणे तुम्हीही उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. तुम्हाला शेतकऱ्यांपेक्षा खुर्चीवर जास्त प्रेम आहे असा टोला त्यांनी लगावला. तर कॉंग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे खासदार दीपेंद्र हूडा यांनी पंजाबचा अकाली दल, आम आदमी पक्षाने संसदेत कॉंग्रेसबरोबर शेतकरीविरोधी कायद्याचा विरोध करण्याचं धैर्य दाखवले, पण दुर्दैवाने सत्तेसाठी हरियाणामधील भाजपा आणि जेजेपी नेत्यांनी सत्तेसाठी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असा आरोप केला आहे. तसेच जेव्हा पंजाबमधील सर्व पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने एकत्र येऊ शकतात, तेव्हा हरियाणात भाजपा-जेजेपी एकत्र का होऊ शकत नाहीत? अकाली दलाच्या हरसिमरत कौर यांच्या राजीनाम्यानंतर हा प्रश्न आणखी बळकट झाला आहे असं काँग्रेसने सांगितले.

हरियाणामध्ये जेजेपी-भाजप युती सरकार

हरियाणामध्ये मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वात सरकार जेजेपीच्या पाठिंब्याने सुरू आहे. चौधरी देवीलाल हे शेतकरी नेते म्हणून देशभरात ओळखले जातात. जेजेपीचा राजकीय आधार ग्रामीण भाग आणि शेतकर्‍यांवर अवलंबून आहे. शेतकर्‍यांची नाराजी आणि राजकीय नुकसान पाहता जेजेपीने लाठीचार्ज केल्यानं शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. दुष्यंत चौटाला यांचे छोटे भाऊ दिग्विजय चौटाला म्हणाले, 'शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याबद्दल जेजेपी माफी मागते. जेजेपी नेहमीच शेतकर्‍यांच्या पाठीशी असून त्यांचे हित पक्षाचं प्राधान्य आहे असं म्हटलं आहे.

जेजेपीचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला हे कृषी विधेयकाच्या समर्थनात आहेत तर कॉंग्रेसवर शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हे विधेयक गुरुवारी लोकसभेत मंजूर झाले आहे. तथापि, जेजेपीची या मुद्द्यावरुन कोंडी झाली आहे. पक्षाच्या आमदारांनी बंडाची भूमिका घेतली आहे. अशा परिस्थितीत दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सोडतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Pressure on JJP to leave from BJP Government in Hariyana after Akali Dal over farmers Issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.