Pooja Chavan Case: पूजा चव्हाण प्रकरण भोवले; अखेर संजय राठोड यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 06:51 AM2021-03-01T06:51:12+5:302021-03-01T06:51:53+5:30

Sanjay Rathod News: आघाडी सरकारला धक्का; विरोधकांकडून गलिच्छ राजकारण होत असल्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आरोप.

Pooja Chavan Case: Shivsena Minister Sanjay Rathod resigned | Pooja Chavan Case: पूजा चव्हाण प्रकरण भोवले; अखेर संजय राठोड यांचा राजीनामा

Pooja Chavan Case: पूजा चव्हाण प्रकरण भोवले; अखेर संजय राठोड यांचा राजीनामा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंध जोडले गेलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर रविवारी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविला. राठोड यांचा राजीनामा स्वीकारल्याचे सांगतानाच या प्रकरणात विरोधकांकडून गलिच्छ राजकारण सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला. 


बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने ७ फेब्रुवारी रोजी पुणे येथे एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पूजाच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या ऑडिओ क्लिप्समुळे संजय राठोड कमालीचे अडचणीत आले होते. सर्व बाजूंनी घेरले गेलेले राठोड हे रविवारी दुपारी सपत्नीक वर्षा बंगल्यावर गेले आणि त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.  अशा प्रकारे राजीनामा द्यावा लागलेले राठोड हे पहिलेच मंत्री आहेत. 


 पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड, अरुण राठोड आणि  विलास चव्हाण यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसाठी पूजाची आजी शांताबाई राठोड, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई उपोषणाला बसल्या आहेत. मात्र, शांताबाई राठोड यांचा आमच्या कुटुंबाशी कोणतेही रक्ताचे नाते नाही, असे पूजाच्या आई-वडिलांनी आपल्याला सांगितले असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले. 

पूजाचे आई-वडील मुख्यमंत्र्यांना भेटले
पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण, आई मंदोदरी व बहीण दिव्याणी यांनी रविवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, ही आमची मागणी नाही. पूजा व आमच्या कुटुंबाची नाहक बदनामी केली जात असून, गलिच्छ राजकारण केले जात आहे. संजय राठोड आमच्या समाजाचे नेते आहेत. पूजाच्या मृत्यूप्रकरणी संजय राठोड यांच्यावर गलिच्छ आरोप करणाऱ्या उलटसुलट बातम्या येत आहेत, त्या निराधार आहेत. पूजा मृत्यू प्रकरणात आपण चौकशीचे आदेश दिलेले आहेत. आमचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. राठोड यांच्या राजीनाम्याची कोणतीही मागणी आम्ही केलेली नाही. त्यांना आरोपी ठरवून त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेऊ नका, फक्त संशयावरून त्यांचा बळी जाऊ नये, असे या तिघांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्र परिषदेत हे पत्र वाचून दाखविले. 

 राठोडांचा राजीनामा मी स्वीकारला आहे; पण यानिमित्ताने विरोधकांनी अत्यंत गलिच्छ राजकारण अन् निव्वळ आदळआपट चालविली आहे. पूजाच्या मृत्यूप्रकरणी चौकशी पूर्णत: नि:पक्षपणेच होईल. कोणी कितीही मोठा असला, तरी दोषींवर कारवाई ही होईलच; पण एखाद्याला राजकारणातून उठवायचंच अशा पद्धतीने तपासाआधीच आरोप करत सुटणं योग्य नाही.     - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

पूजा चव्हाण या बंजारा समाजातील तरुणीच्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी विरोधी पक्षाने अत्यंत घाणेरडे राजकारण करून माझी तसेच माझ्या समाजाची बदनामी केली. मला राजकीय जीवनातून उठविण्याचा प्रयत्न केला. पूजा मृत्यू प्रकरणाची चौकशी नि:पक्षपणे व्हावी, यासाठी मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. सत्य काय ते बाहेर यावे. राठोड राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही, ही विरोधकांची भूमिका घटनाविरोधी होती. आधी चौकशी होऊ द्या, अशी भूमिका मी घेतलेली होती, पण चौकशी नि:पक्ष व्हावी, यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपविला आहे. 
    - संजय राठोड, माजी वनमंत्री 

Web Title: Pooja Chavan Case: Shivsena Minister Sanjay Rathod resigned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.