"Only those who will participate in the farmers' movement will be given election tickets," RLD announced | "जो शेतकरी आंदोलनात सहभागी होणार, त्यालाच निवडणुकीचं तिकीट देणार," या पक्षाने केली घोषणा

"जो शेतकरी आंदोलनात सहभागी होणार, त्यालाच निवडणुकीचं तिकीट देणार," या पक्षाने केली घोषणा

ठळक मुद्देयावेळी होणाऱ्या निवडणुकीत आरएलडीचे तिकीट त्याच नेत्यांना मिळेल जे आंदोलनामध्ये सहभागी होतीलजे आंदोलनामध्ये सहभागी होणार नाहीत. मग ते कुठल्याही पक्षाचे असेनात जनतेने त्यांच्याकडून जबाब मागितला पाहिजेजे लोक रामाच्या नावावर मत मागत आहेत आणि देणग्या गोळा करत आहेत, त्यांना जनतेने विचारले पाहिजे

लखनौ - केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे राजकीय पडसादही उमटत आहेत. दरम्यान, शेतकरी आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी एका राजकीय पक्षाने मोठी घोषणा केली आहे. जो ने शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होईल. त्यालाच पुढील निवडणुकीत तिकीट देण्यात येईल, अशी घोषणा राष्ट्रील लोकदल पक्षाचे उपाध्यक्ष जयंत चौधरी यांनी केली आहे. यावेळी जयंत चौधरी यांनी २६ जानेवारी रोजी शेतकरी आंदोलनात सहभागी होऊन ट्रॅक्टर मोर्चा काढावा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

आरएलडीचे उपाध्यक्ष जयंत चौधरी हे बडौत येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाले होते. तिथे त्यांनी कृषी कायद्यांचा विरोध केला. तसेच सरकारने शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले पाहिजे आणि हे कृषी कायदे मागे घेतले पाहिजेत, असे आवाहन केंद्र सरकारला केले. यावेळीच त्यांनी ट्रॅक्टर मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.


जयंत चौधरी म्हणाले की, यावेळी होणाऱ्या निवडणुकीत आरएलडीचे तिकीट त्याच नेत्यांना मिळेल जे आंदोलनामध्ये सहभागी होतील. त्यासाठी एक नोंदवही ठेवा, त्यामध्ये तिकीट मिळालेल्या नेत्यांची नावे लिहून द्या. जे आंदोलनाला आलेले असतील त्यांनाच तिकीट दिले जाईल. जे आंदोलनामध्ये सहभागी होणार नाहीत. मग ते कुठल्याही पक्षाचे असेनात जनतेने त्यांच्याकडून जबाब मागितला पाहिजे.

यावेळी राम मंदिरासाठी स्वीकारण्यात येत असलेल्या देणग्यांवरूनही जयंत चौधरी यांनी भाजपाला टोला लगावला आहे. जे लोक रामाच्या नावावर मत मागत आहेत आणि देणग्या गोळा करत आहेत, त्यांना जनतेने विचारले पाहिजे, असे जयंत चौधरी म्हणाले.

Web Title: "Only those who will participate in the farmers' movement will be given election tickets," RLD announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.