अपशकुनी वॉर्ड; गृहमंंत्री अमित शहांना का वाटतेय एम्सच्या तळमजल्यावरील VVIP कक्षाची भीती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 07:34 IST2020-08-23T01:39:00+5:302020-08-23T07:34:34+5:30
पूर्ण बरे झाल्यावर अमित शहा कृष्ण मेनन मार्गावरील त्यांच्या शासकीय निवासस्थानी परतले; पण प्रकरण तेवढ्यावरच संपले नाही. त्याच दिवशी रात्री २ वाजता अमित शहा यांना पुन्हा त्रास होऊ लागला.

अपशकुनी वॉर्ड; गृहमंंत्री अमित शहांना का वाटतेय एम्सच्या तळमजल्यावरील VVIP कक्षाची भीती?
हरीश गुप्ता, राष्ट्रीय संपादक, लोकमत
कोविड-१९ साथीची लागण झाल्यावर गृहमंत्री अमित शहा मेदान्त इस्पितळात का दाखल झाले, याचा किस्साही मजेशीर आहे. खरे तर दिल्लीतील अ.भा. आयुर्विज्ञान संस्था (एम्स) अगदी जवळ होती व तेथे अत्याधुनिक असा स्वतंत्र व्हीव्हीआयपी वॉर्डही आहे. तरीही तेथे न जाता शहा गुरुग्रामपर्यंत मोटारीने गेले. शहा मेदान्तमध्ये गेल्यावर ते तेथे का गेले याचा मागोवा घेण्यासाठी ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरियाही लगोलग तेथे पोहोचले. त्यांना शहा यांच्याकडून असे कळविण्यात आले की, गृहमंत्र्यांची ‘एम्स’बद्दल काहीच तक्रार नाही; पण तेथील व्हीव्हीआयपी वॉर्ड तळमजल्यावर असल्याने तेथे दाखल होणे त्यांनी नापसंत केले. तसेच मेदान्तमध्ये असले तरी ‘एम्स’ डॉक्टरांच्याच देखरेखीखाली ते येथेही असतील; पण डॉ. गुलेरिया यांचे या सांगण्याने समाधान झाले नाही.
अमित शहा बरे झाल्यावर डॉ. गुलेरिया यांनी त्यांना सांगितले की, ‘एम्स’मध्ये पाचव्या मजल्यावर एक जुना व्हीव्हीआयपी वॉर्डही आहे. इंदिरा गांधी यांची ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी हत्या झाल्यानंतर आता तळमजल्यावर असलेला नवा व्हीव्हीआयपी वॉर्ड खास राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधान यांच्यासाठी तयार केला गेला. पूर्ण बरे झाल्यावर अमित शहा कृष्ण मेनन मार्गावरील त्यांच्या शासकीय निवासस्थानी परतले; पण प्रकरण तेवढ्यावरच संपले नाही. त्याच दिवशी रात्री २ वाजता अमित शहा यांना पुन्हा त्रास होऊ लागला. या वेळी मात्र त्यांनी मेदान्तमध्ये न जाता ते ‘एम्स’च्या पाचव्या मजल्यावरील खासगी व्हीव्हीआयपी वॉर्डात दाखल झाले
पण ‘भिंतीला कान’ लावले असता जे समजले ते कारण असे की, अलीकडेच ‘एम्स’च्या तळमजल्यावरील व्हीव्हीआयपी वॉर्डात झालेल्या मृत्यूंमुळे अमित शहा त्या वॉर्डाला अपशकुनी मानतात. त्यांच्या समर्थकांच्या मते तो वॉर्ड वास्तुशास्त्रानुसारही अयोग्य ठिकाणी आहे. ते काहीही असो, अमित शहा नंतरच्या वेळेला या तळमजल्यावरील वॉर्डऐवजी पाचव्या मजल्यावरील वॉर्डमध्ये दाखल झाले हे मात्र पुरेसे बोलके आहे.