Now Mahavikas Aghadi formula will also work in Nagar Panchayat elections | आता नगरपंचायत निवडणुकीतही चालणार महाविकास आघाडी फॉर्म्युला

आता नगरपंचायत निवडणुकीतही चालणार महाविकास आघाडी फॉर्म्युला

ठळक मुद्देनगरपंचायत निवडणुकीआधी आघाडी नंतर जागा वाटपाचा निर्णय होणार असल्याचे संकेत निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी होण्यावरच तिन्हीही पक्षांचा सकारात्मक विचार

औरंगाबाद : विधानपरिषदेच्या ६ जागेवर महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढत ४ जागा जिंकल्या आहेत. सरकार स्थापनेनंतर पहिल्याच परीक्षेत महाविकास आघाडीने घवघवीत यश संपादन केले आहे. यामुळे आता आगामी काळात होणाऱ्या महापालिका, नगरपंचायत निवडणुकीतही हाच फॉर्म्युला चालणार यावर खलबत सुरु आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव नगरपंचायतची आगामी निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची चर्चा आहे. याबाबत शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षातील नेत्यांनी तसे संकेतही दिले आहेत. यामुळे येणाऱ्या काळात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा सामना आणखी रंगत जाणार आहे.

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ, नागपूर पदवीधर मतदारसंघ, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ या ४ जागांवर महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. तर भाजपला  धुळे - नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची केवळ एक जागा मिळाली आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. महाविकास आघाडीचे भविष्य ठरवणारी निवडणूक असेच या सहा जागेकडे पाहण्यात येत असल्याने यात चुरस होती. यात वर्चस्व राखल्याने आता तीनही पक्षांचे लक्ष पुढील काळातील होणाऱ्या महापालिका, नगरपंचायत निवडणुकांवर आहे. 


याबाबत कोणत्याच पक्षाने जाहीर भूमिका मांडली नसली तरी तीनही पक्ष महाविकास आघाडी खालीच निवडणुकीस सामोरे जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. लवकरच याचा प्रत्येय औरंगाबाद जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत येऊ शकतो अशी चर्चा आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडी होण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रंगनाथ काळे यांनी दिले. मागील निवडणुकीत शिवसेनेसोबत असलेली भाजपा या निवडणुकीत एकाकी पडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या मेळाव्यातही पक्षाचे संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर यांनी महाविकास आघाडीला हिरवा कंदील दाखविला होता. आता फक्त घोषणेची औपचारिकता बाकी असून काँग्रेसशी देखील चर्चा होत आहे, असेही रंगनाथ काळे यांनी सांगितले. 

आधी आघाडी नंतर जागा वाटपाचा निर्णय
आगामी काळात सोयगाव नगरपंचायतीच्या निवडणूक होणार असून, त्या दृष्टीने रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्या महाविकास आघाडीत फाॅर्म्युला ठरणार आहे. निवडणुकीपूर्वी आधी महाविकास आघाडी होण्यावरच तिन्हीही पक्षांचा सकारात्मक विचार असून त्यानंतर मात्र जागा वाटपाचा फाॅर्म्युला ठरणार असल्याची माहिती रंगनाथ काळे यांनी दिली आहे.

Web Title: Now Mahavikas Aghadi formula will also work in Nagar Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.