काँग्रेसमध्ये अशोक चव्हाणांचं कोणीही ऐकत नाही- अब्दुल सत्तार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 14:59 IST2019-03-24T14:50:37+5:302019-03-24T14:59:28+5:30
'ती' फक्त सदिच्छा भेट, मी अपक्षच लढणार; भाजपा प्रवेशाबद्दलच्या चर्चेवर सत्तारांचा खुलासा

काँग्रेसमध्ये अशोक चव्हाणांचं कोणीही ऐकत नाही- अब्दुल सत्तार
मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशो चव्हाणांचं पक्षात कोणीही ऐकत नाही. ते इथे शब्द देतात. मात्र दिल्लीतून त्यांचा शब्द फिरवला जातो, असं काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री भेट घेतल्यानं काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावर स्पष्टीकरण देत मी अपक्षच लढणार असल्याचं सत्तार यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस माझे जुन मित्र आहेत. राजीनामा देण्यासाठी त्यांची भेट घेतली, अशी माहिती सत्तार यांनी दिली.
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षावर सत्तार यांनी भाष्य केलं. पक्षात अशोक चव्हाण यांचं ऐकलं जात नाही. त्यांनी दिलेला शब्द दिल्लीवरुन फिरवला जातो, असं सत्तार म्हणाले. सत्तार प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेली खदखद महत्त्वाची मानले जात आहे. औरंगाबाद मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. या मतदारसंघातून शिवसेनेनं विद्यमान खासदार चंद्रकांत खैरेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री तुम्हाला कशी मदत करणार, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर खैरे यांना पराभूत करणं हेच लक्ष्य आहे. मात्र त्यासाठी मदत करण्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलणी झालेली नाही, असं सत्तार यांनी सांगितलं. आपण अपक्ष म्हणून लढणार याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यानं काँग्रेसवर नाराज झालेले अब्दुल सत्तार यांनी मध्यरात्री दोनच्या सुमारास मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. मात्र ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं खुलासा सत्तार यांनी केला. मी विरोधी पक्षाचा आमदार असूनही गेल्या साडे चार वर्षांमध्ये मुख्यमंत्र्यांनी माझी मदत केली. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा त्यांच्याकडे सोपवला, असं सत्तार म्हणाले. विशेष म्हणजे सत्तार यांनी तिकीट न मिळाल्यानं काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचादेखील राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं औरंगाबादमधून सुभाष झांबड यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर सत्तार यांनी पक्षाविरोधात बंड केलं. सत्तार औरंगाबादमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते.