नितीशकुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री; मंत्र्यांची आज पहिली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 05:40 AM2020-11-17T05:40:31+5:302020-11-17T05:46:54+5:30

भाजपचे तारकिशोर प्रसाद आणि रेणुदेवी यांना उपमुख्यमंत्री नियुक्त करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्रिपद घटनात्मक नसल्यामुळे या दोघांनी मंत्री म्हणूनच शपथ घेतली असून मंत्रिमंडळात त्यांना हा दर्जा दिला जाईल. 

Nitish Kumar is the Chief Minister of Bihar for the seventh time | नितीशकुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री; मंत्र्यांची आज पहिली बैठक

नितीशकुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री; मंत्र्यांची आज पहिली बैठक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा : नितीशकुमार यांनी दोन दशकात सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा मान पटकावला आहे. सोमवारी संध्याकाळी राजभवनात पार पडलेल्या १४ सदस्यीय मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात दोन उपमुख्यमंत्र्यांचा समावेश होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्यासह रालोआचे ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. राजदच्या नेतृत्वातील महाआघाडीने मात्र शपथविधीवर बहिष्कार घातला.
राज्यपाल फगू चौहान यांनी नितीशकुमार यांच्यासह नव्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.


नितीशकुमार यांनी सर्वानुमते रालोआच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आल्यानंतर रविवारी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला होता. ६९वर्षीय नितीशकुमार हे २००५ पासून कायम मुख्यमंत्री राहिले आहेत. अपवाद केवळ २०१४-१५ सालचा. त्यावेळी जतीनराम मांझी यांच्याकडे काही काळ मुख्यमंत्रिपद होते. यापूर्वी श्रीकृष्ण सिंग हे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले होते. त्यांचा विक्रम मोडण्याचा मान नितीशकुमार यांच्याकडे राहील.


भाजपच्या वाट्याला  सात मंत्रिपदे....
भाजपचे तारकिशोर प्रसाद आणि रेणुदेवी यांना उपमुख्यमंत्री नियुक्त करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्रिपद घटनात्मक नसल्यामुळे या दोघांनी मंत्री म्हणूनच शपथ घेतली असून मंत्रिमंडळात त्यांना हा दर्जा दिला जाईल. 
हे दोघेही व्यासपीठावर नितीशकुमार यांच्या बाजूला बसले होते. जेडीयूच्या पाच मंत्र्यासह हिंदुस्थानी अवामी मोर्चा (हम) आणि विकासशील इन्सान पार्टीच्या (व्हीआयपी) प्रत्येकी एका सदस्याला मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. बिजेंद्र प्रसाद यादव, अशोक चौधरी, विजयकुमार चौधरी या जुन्या सहकाऱ्यांसह मेवालाल चौधरी आणि शीलाकुमारी मंडल हे जदयूचे प्रतिनिधित्व करीत आहेत.  

रालोआचे कुटुंब प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करेल- मोदी
रालोआचे कुटुंब बिहारच्या प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे अभिनंदन करताना दिली आहे. बिहारच्या कल्याणासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासनही त्यांनी नितीशकुमार यांना पाठविलेल्या ट्वीटमध्ये दिले आहे. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमारजी यांचे अभिनंदन. बिहार सरकारमधील सर्व मंत्र्यांचे अभिनंदन. बिहारच्या विकासासाठी रालोआचे कुटुंब एकजुटीने कार्य करेल, असे मोदींनी म्हटले.

Web Title: Nitish Kumar is the Chief Minister of Bihar for the seventh time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.