शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांवरील ईडी कारवाईवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

By प्रविण मरगळे | Published: November 24, 2020 06:34 PM2020-11-24T18:34:46+5:302020-11-24T18:36:51+5:30

Sharad Pawar Reaction on Pratap Sarnaik ED Action News: राज्यात वेगळ्या पद्धतीने राज्य चालवण्याचा‌ प्रयत्न आम्ही करतोय. तिन्ही पक्षाच्या आघाडीकडून वर्षभर चांगलं सरकार चालवण्याचा आमचा‌ प्रयत्न राहिला

NCP Sharad Pawar first reaction on ED action against Shiv Sena MLA Pratap Saranaik | शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांवरील ईडी कारवाईवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांवरील ईडी कारवाईवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Next
ठळक मुद्देईडीचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे.शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीच्या बाबतीत घडत असल्याचं आज टिव्हीवर पहायला मिळत आहेराज्य सरकार सर्वांवर मात करुन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे.

मुंबई – ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयात ईडीने धाड टाकली आहे, या कारवाईमुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकारण रंगलं आहे, भाजपाच्या दबावापोटीच ईडीनं ही सुडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे, त्याला भाजपानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं, मात्र ईडीच्या या कारवाई राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत शरद पवार म्हणाले की, ईडीचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीच्या बाबतीत घडत असल्याचं आज टिव्हीवर पहायला मिळत आहे. राज्य सरकार सर्वांवर मात करुन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. जनतेच्या प्रश्नासाठी आघाडीचे निर्णय महत्वाचे ठरत आहेत, राष्ट्रवादीचा प्रतिनिधी सर्वांना घेऊन काम करत आहे. अनेक संकटात जनतेच्या खांद्याला खांदा लावून सरकार व लोकप्रतिनिधी काम करत आहेत, असं त्यांनी सांगितले.

राज्य वेगळ्या पद्धतीनं चालवण्याचा प्रयत्न

राज्यात वेगळ्या पद्धतीने राज्य चालवण्याचा‌ प्रयत्न आम्ही करतोय. तिन्ही पक्षाच्या आघाडीकडून वर्षभर चांगलं सरकार चालवण्याचा आमचा‌ प्रयत्न राहिला असून संकटं आली, कधी अतिवृष्टी झाली तरीही सरकार सामान्य माणसाच्या पाठीमागे उभे राहिले असल्याचा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. रोगराईचे आज संकट आहे. संकट सुरुवात होण्याआधी प्रदेशाध्यक्ष यांनी संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले ते काम थांबले परंतु कोरोना संपल्यानंतर तेच काम जोमाने सुरू होईल. आम्ही शेवटच्या माणसासाठी काम करतोय हे चित्र लवकरच दिसेल. हे आमचं कुटुंब आहे. आणि कुटुंब म्हणून आम्ही काम करतोय. लोकांच्या भल्यासाठी सरकार काम करत आहे राष्ट्रवादीचा प्रतिनिधी सर्वांना घेऊन काम करत आहे. अनेक संकटात जनतेच्या खांद्याला खांदा लावून सरकार व लोकप्रतिनिधी काम करत असल्याची पोचपावती शरद पवार यांनी दिली

ठाण्याच्या आगीची झळ मुंबईपर्यंत पोहचण्याची भीती – भाजपा

ठाकरे सरकारचा काय प्रॉब्लेम आहे? ड्रगवाल्यांवर कारवाई केली तरी यांना त्रास होतो, हवाला आणि काळ पैसा प्रकरणी कारवाई केली तरी खाली वर होतात. मग कारवाई काय फक्त सॉफ्टटार्गेट असलेल्या पत्रकार आणि कंगनासारख्या अभिनेत्रीवर व्हावी का? ठाण्यात लागलेल्या आगीच्या झळा मुंबईपर्यंत पोहचतील ही भीती असावी काय? पण चिंता कशाला? कायद्यापेक्षा कोणी मोठे नाही असं सांगत आमदार अतुल भातखळकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला आहे.

सरनाईकांवरील कारवाई दुर्दैवी – काँग्रेस

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, ही कारवाई दुर्दैवी आणि आक्षेपार्ह आहे. केंद्रातील भाजप सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असून भाजपाविरोधात  बोलणाऱ्यांचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ईडी, सीबीआय, सारख्या केंद्राच्या तपास यंत्रणाचा राजकीय कारणांसाठी वापर करुन विरोधकांना धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी कारवाई भाजपाशासित राज्यात झाल्याचे दिसत नाही असंही त्यांनी नमूद केले.

आम्हाला कोणाच्या बापाला घाबरत नाही; संजय राऊत आक्रमक

कितीही प्रयत्न केला तरी हे महाविकास आघाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. तुम्ही सुरुवात केली असेत तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. आमच्या मंत्री, आमदारांच्या घराबाहेर ईडीनं कार्यालयं थाटली, तरीही आम्ही घाबरत नाही. ईडी एखाद्या राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणं काम करतेय, अशी टीका त्यांनी केली.

सरनाईक यांच्यावर कार्यालयावर कारवाई हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. कितीही दबाव आणला तरी महाविकास आाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. सरकारी संस्थांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र सुरुवात तुम्ही केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे. ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. मात्र अशा कारवाया करून पुढची २५ वर्षे भाजपाचे महाराष्ट्रात सरकार येणार नाही. तसेच सरकारी संस्थांनी राजकीय शाखा असल्यासारखे वागू नये, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला आहे

Web Title: NCP Sharad Pawar first reaction on ED action against Shiv Sena MLA Pratap Saranaik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.