मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची तयारी; 'या' दोन बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी?

By कुणाल गवाणकर | Published: November 22, 2020 03:41 PM2020-11-22T15:41:51+5:302020-11-22T15:48:18+5:30

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सगळे पक्ष लागले कामाला; संघटन बांधणीवर राष्ट्रवादीचं लक्ष

ncp likely to give responsibility of bmc election to mp supriya sule and mla rohit pawar | मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची तयारी; 'या' दोन बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी?

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची तयारी; 'या' दोन बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी?

Next

मुंबई: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भारतीय जनता पक्षानं जोरदार तयारी सुरू केली आहे. महापालिकेवर भगवा फडकणारच यावरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरू झालं आहे. त्यामुळे राजकारण तापलं आहे. त्यातच राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेसनं मात्र आपण स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करत एकला चलो रेची भूमिका घेतली आहे. यानंतर आता राष्ट्रवादीनंदेखील पालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. 

मुंबई महापालिका निवडणुकीची लक्षात घेऊन राष्ट्रवादीनं पक्षाची बांधणी मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. याबद्दलची माहिती पक्षाचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी दिली. 'कोरोनाचं संकट येण्यापूर्वी वांद्रे कुर्ला संकुलात शहरातील सक्रिय कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्याला ८ हजार कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोना संकट असल्यानं सध्या मेळावे, कार्यक्रम घेता येत नाहीत. पण संघटनेच्या बांधणीवर काम सुरू आहे. पूर्ण अनलॉक झाल्यावर मेळावे, कार्यक्रम घेता येतील,' असं मलिक म्हणाले.

मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे. तशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावरही मलिक यांनी भाष्य केलं. 'निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून अद्याप कोणाचीही निवड झालेली नाही. मात्र सुप्रिया सुळे, रोहित पवारांनी लक्ष घातल्यास चांगलंच असेल. त्याचा पक्षाला फायदाच होईल,' असं मलिक यांनी सांगितलं.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी आहे. हे तीन पक्ष सरकारमध्ये एकत्र आहेत. मात्र काँग्रेसनं मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर राज्य सरकारमध्ये एकत्र असलेल्या पक्षांनी एकसंध राहायला हवं, असं विधान मलिक यांनी केलं. २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचं मोठं नुकसान झालं. त्यांच्या जागा ५२ वरून ३१ वर आल्या. तर राष्ट्रवादीचे ९ उमेदवार विजयी झाले. शिवसेनेला ८४, तर भाजपला ८२ जागा मिळाल्या होत्या.
 

Web Title: ncp likely to give responsibility of bmc election to mp supriya sule and mla rohit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.