औरंगजेब दुष्ट राजा होता, मुस्लीम समाजालाही त्याच्याविषयी प्रेम नाही - चंद्रकांत खैरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 05:09 PM2021-01-17T17:09:17+5:302021-01-17T17:10:03+5:30

Chandrakant Khaire : औरंगाबादचे नामांतर झाल्यास आपली मुस्लीम मते जातील, हा गैरसमज काँग्रेस पक्षाने मनातून काढून टाकावा, असेही चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.

muslim community dont like aurangzeb, Shivsena leader Chandrakant Khaire on Congress stand over Aurangabad name changing issue | औरंगजेब दुष्ट राजा होता, मुस्लीम समाजालाही त्याच्याविषयी प्रेम नाही - चंद्रकांत खैरे

औरंगजेब दुष्ट राजा होता, मुस्लीम समाजालाही त्याच्याविषयी प्रेम नाही - चंद्रकांत खैरे

googlenewsNext
ठळक मुद्देऔरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर 'सामना'तून काँग्रेस पक्षावर निशाणा साधण्यात आला होता. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रसिद्धीपत्रक काढून 'रोखठोक' प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. यातच औरंगजेब हा अत्यंत दुष्ट राजा होता. मुस्लीम समाजालाही त्याच्याविषयी प्रेम वाटत नाही, असे विधान शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले. तसेच, औरंगाबादचे नामांतर हा अस्मितेचा प्रश्न आहे. औरंगाबादचे नामांतर झाल्यास आपली मुस्लीम मते जातील, हा गैरसमज काँग्रेस पक्षाने मनातून काढून टाकावा, असेही चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर 'सामना'तून काँग्रेस पक्षावर निशाणा साधण्यात आला होता. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रसिद्धीपत्रक काढून 'रोखठोक' प्रत्युत्तर दिले आहे. नामांतराचे राजकारण कोणाला प्रिय? पाच वर्षे सत्तेत असलेलेच ढोंगीपणा करत आहेत? असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेसोबत भाजपावरही निशाणा साधला आहे. 

या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे यांनी 'टीव्ही 9 मराठी'शी चर्चा केली. यावेळी "बाळासाहेब थोरात यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब थोरात हे माझे मित्र आहेत. त्यांना मी एवढेच सांगू इच्छितो की, औरंगजेब दुष्ट राजा होता. मुस्लीम समाजालाही त्याच्याविषयी प्रेम नाही. त्यामुळे औरंगाबादच्या नामांतरामुळे मुस्लीम व्होट बँकेला धक्का बसण्याची भीती काँग्रेसने बाळगू नये," असे चंद्रकांत खैरे म्हणाले. 

याचबरोबर, बाळासाहेब थोरात यांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात एकत्र बसून या सगळ्यातून मार्ग काढतील. पण, औरंगाबादचे नामांतर होणार म्हणजे होणार, हे निश्चित आहे. आगामी काळात काँग्रेस नामांतराला विरोध करणार नाही, असा विश्वास मला वाटत असल्याचे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा नामांतराचा मुद्दा आठवला नाही का? - बाळासाहेब थोरात 
औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी एक प्रसिद्धीपत्रक ट्विट केले आहे. "औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडत आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहेत. काँग्रेसने आपली भूमिका याआधीच स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, मागील ५ वर्ष एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत. हा ढोंगीपणा नाहीतर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा आठवला नाही का?", अशी रोखठोक भूमिका बाळासाहेब थोरात यांनी मांडली आहे. 

"शिवसेनेला मतांची चिंता"
बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला लक्ष्य करताना म्हटले की, "राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते. त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा 'सामना' सुरू केला आहे. भाजपच्या बाबतीत बोलायचे झाले तर ढोंगीपणा हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्यच आहे. त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्याकडे जनता करमणूक म्हणून पाहते", अशी शेलक्या शब्दांत टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. 
 

Web Title: muslim community dont like aurangzeb, Shivsena leader Chandrakant Khaire on Congress stand over Aurangabad name changing issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.