More than 30,000 deaths due to corona could have been prevented in the state -Devendra Fadanvis | "तर राज्यात कोरोनामुळे झालेले ३० हजारांहून अधिक मृत्यू टाळता आले असते"

"तर राज्यात कोरोनामुळे झालेले ३० हजारांहून अधिक मृत्यू टाळता आले असते"

 मुंबई - गेल्या वर्षभरापासून देशात सुरू असलेल्या कोरोनाच्या संसर्गाचे संकट अद्याप टळलेले नाही. (Coronavirus in Maharashtra)या वर्षभरात कोरोनामुळे महाराष्ट्रातही बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोनाबळींमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे. (More than 30,000 deaths due to corona could have been prevented in the state, Devendra Fadnvis Criticize Maharashtra Government )

आज विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर सुरू असलेल्या चर्चेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाकाळातील राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहासमोर आकडेवारी मांडत राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. फडणवीस म्हणाले की, सातत्याने कमी चाचण्या केल्याने राज्यातील कोरोना वाढला आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती आजही गंभीर आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने कोरोनाचा प्रश्न नीट हाताळला असता तर ९ लाख ५५ हजार रुग्ण कमी राहिले असते. तसेच ३० हजार ९०० मृत्यू कमी झाले असते. आता ही जबाबदारी कुणाची? केंद्र सरकारचा आर्थिक पाहणीचा अहवाल अतिशय बोलका आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.   

फडणवीस पुढे म्हणाले की, ठाकरे सरकारला कोरोना हाताळण्यात अपयश आल्याचा दावा फडणवीस यांनी आकडेवारीसह केला. 'देशाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ ९ टक्के लोकसंख्या आपल्या राज्यात आहे. पण देशातील एकूण कोरोना रुग्णांच्या मृत्यूंपैकी ३३ टक्के एकट्या महाराष्ट्रात आहेत. देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ४० टक्के कोरोना रुग्ण राज्यात आहेत. सक्रिय रुग्णांची संख्यादेखील मोठी आहे. सध्या राज्यात ४६ हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत,' अशी आकडेवारी फडणवीस यांनी विधानसभेत सांगितली.

कोरोनाकाळातील भ्रष्टाचारावरूनही देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. कोरोना काळात जम्बो कोविड सेंटरच्या माध्यमातून राज्यात जम्बो भ्रष्टाचार झाला. मृताच्या टाळूवरचे लोणी खाणे म्हणजे काय याचा अर्थ या सरकारने समजावून सांगितला, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. 

Web Title: More than 30,000 deaths due to corona could have been prevented in the state -Devendra Fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.