मोदींचे मंत्री अडचणीत; हजार कोटींच्या संजीवनी घोटाळ्यात उच्च न्यायालयाची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 21:59 IST2020-12-22T21:58:41+5:302020-12-22T21:59:08+5:30
Sanjivani society Fraud: संजीवनीच्य़ा गुंतवणूकदारांनी घोटाळ्यातील रक्कम मिळविण्यासाठी आणि कायदेशीर लढ्यासाठी संजिवनी पीडित संघच्या नावे एक संस्था स्थापन केली होती. त्यांनीच ही याचिका दाखल केली होती. विक्रम सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फसवणूक केली आणि बनावट रेकॉर्ड रजिस्टर दाखवून गुंतवणूकदारांना भ्रमात ठेवले, असा आरोप करण्यात आला आहे.

मोदींचे मंत्री अडचणीत; हजार कोटींच्या संजीवनी घोटाळ्यात उच्च न्यायालयाची नोटीस
जोधपूर : राजस्थान उच्च न्यायालयाने संजीवनी क्रेडिट कोऑपरेटीव्ह सोसायटी घोटाळा प्रकरणी केंद्रीय जलऊर्जा मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि त्यांची पत्नी नोनद कंवर यांना नोटीस पाठविली आहे. न्यायालयाने या प्रकरणी आणखी १७ जणांना नोटीस पाठविली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून राजस्थानच्या राजकारणात या प्रकरणावरून मोठी खळबळ उडालेली आहे.
काँग्रेस सरकार पाडण्याच्या प्रयत्नावरून तसेच आमदारांची खरेदी करण्यावरून केंद्रीय मंत्री शेखावत हे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निशान्यावर आलेले आहेत. आता न्यायालयाने नोटीस पाठविल्याने पुन्हा वातावरण तापलेले आहे.
देशभरातील दीड लाख गुंतवणूक दारांचे एक हजार कोटींहून अधिक पैसे हडपण्यात आले आहेत. यावर संजीवनी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीविरोधात राजस्थान उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांनी शेखावत व त्यांच्या पत्नीसह १४ पक्षकारांना नोटीस पाठविली आहे.
संजीवनीच्य़ा गुंतवणूकदारांनी घोटाळ्यातील रक्कम मिळविण्यासाठी आणि कायदेशीर लढ्यासाठी संजिवनी पीडित संघच्या नावे एक संस्था स्थापन केली होती. त्यांनीच ही याचिका दाखल केली होती. विक्रम सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फसवणूक केली आणि बनावट रेकॉर्ड रजिस्टर दाखवून गुंतवणूकदारांना भ्रमात ठेवले, असा आरोप करण्यात आला आहे. या याचिकेमध्ये शेखावत यांचेही नाव असून या घोटाळ्याची ईडी, SFIO, CBI कडून चौकशी केली जावी अशी मागणी करण्यात आली आहे.
पाच महिन्यांपूवी काँग्रेसचे सरकार पाडण्याचा आरोप झाल्यानंतर शेखावत यांनी सोसायटीच्या घोटाळ्याप्रकरणी चौकशीला तयार असल्याचे सांगितले होते. तपास यंत्रणांनी मागितलेले सर्व कागदपत्र दिले आहेत. गेल्य़ा १२ महिन्यांपासून तपास सुरु असल्याचे ते म्हणाले होते.