'युवराज आदित्य ठाकरेंच्या वरळीत कोरोना नाही का?'; पबमधला व्हिडीओ शेअर करत मनसेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 11:00 IST2021-03-01T10:54:23+5:302021-03-01T11:00:28+5:30

mns slams aditya thackeray: आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन; मुख्यमंत्र्यांचा आवाहनाला हरताळ

mns slams aditya thackeray over Violation of covid precaution norms in worli | 'युवराज आदित्य ठाकरेंच्या वरळीत कोरोना नाही का?'; पबमधला व्हिडीओ शेअर करत मनसेचा सवाल

'युवराज आदित्य ठाकरेंच्या वरळीत कोरोना नाही का?'; पबमधला व्हिडीओ शेअर करत मनसेचा सवाल

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. अनेक भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं पुन्हा निर्बंध लादण्याची वेळ आली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळण्याचं आवाहन सरकार, प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र अनेक ठिकाणी नियमांना हरताळ फासला जात असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) असाच एक प्रकार समोर आणला आहे.

मनसेचे नेते संतोष धुरींनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. वरळीतील पबमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन सुरू असल्याचा प्रकार त्यांनी समोर आणला आहे. या माध्यमातून धुरींनी शिवसेनेचे नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंवर (Shiv Sena Leader Aditya Thackeray) निशाणा साधला आहे. 'मुख्यमंत्री ठाकरे पत्रकार परिषदेत कोरोना संपला नसल्याचं सांगतात. पण वरळीतल्या कमला मिलमध्ये १२ वाजून गेल्यानंतरही पब सुरू आहे. इतर ठिकाणी ११ वाजता पब बंद होतात. मग वरळीतले पब रात्रीचे १२-१ पर्यंत कसे काय सुरू असतात. यांना कोण परवानगी देतं?', असा सवाल धुरींनी उपस्थित केला.

विरोधक आक्रमक, ठाकरे सरकारची आजपासून परीक्षा 

मनसेचे नेते संतोष धुरींनी कमला मिल कंपाऊंडमधल्या युनियन पबमधून फेसबुक लाईव्ह केलं. पबमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं सर्रास उल्लंघन होत असल्याचं व्हिडीओत दिसत होतं. पबमध्ये कोणतंही सोशल डिस्टन्सिंग नव्हतं. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हते. यावरून धुरींनी मंत्री आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं. 'आदित्य ठाकरेंच्या मतदासंघात सर्व नियम धाब्यावर बसवले जातात आणि मुख्यमंत्री सर्वसामान्यांना कोरोना गेलेला नसल्याचं सांगतात. सामान्य लोकांसाठी कोरोना आहे. पण श्रीमंतांसाठी कोरोना नाही. युवराज आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील ही परिस्थिती आहे,' असं धुरी म्हणाले.

Web Title: mns slams aditya thackeray over Violation of covid precaution norms in worli