"MNS can't work without taking betel nut"; criticism of Shiv Sena minister Anil Parab | “मनसे सुपारी घेतल्याशिवाय काम करुच शकत नाही”; शिवसेना मंत्र्याची बोचरी टीका

“मनसे सुपारी घेतल्याशिवाय काम करुच शकत नाही”; शिवसेना मंत्र्याची बोचरी टीका

ठळक मुद्देमुंबई महापालिकेत बदलत्या राजकारणाची नांदी आहे की नाही हे माहिती नाहीकोणाची तरी सुपारी त्यांना घ्यावी लागेल, मनसेचं अस्तित्व सुपारीवर चालू आहेमुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना जिंकेल असा विश्वास

मुंबई – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने कंबर कसलेली असताना शिवसेनेनेही मिशन मुंबई हाती घेतलं आहे, काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईतील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली, या बैठकीत शिवसैनिकांना निवडणुकीसाठी तयारीत राहण्याचे आदेश दिले. दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपा-मनसे एकत्र येणार का? अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

यातच शिवसेना मंत्री अनिल परब यांनी भाजपा-मनसे संभाव्य युतीवर भाष्य करताना मनसेवर बोचरी टीका केली. अनिल परब म्हणाले की, मुंबई महापालिकेत बदलत्या राजकारणाची नांदी आहे की नाही हे माहिती नाही, मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करू शकत नाही, त्यामुळे कोणाची तरी सुपारी त्यांना घ्यावी लागेल, मनसेचं अस्तित्व सुपारीवर चालू आहे, आतापर्यंत विविध पक्षांची सुपारी मनसेने घेतली आहे. ज्या भाजपा नेत्यांना लोकसभेत लाव रे तो व्हिडीओ माध्यमातून उघडंनागडं केलं, त्यामुळे आता नागड्यासोबत उघडा झोपला तर काय परिस्थिती होते ही कदाचित पुढे दिसेल. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना जिंकेल असा विश्वास आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून रणनीती आखण्यासाठी बैठक आयोजित केली होती, या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आगामी महापालिकेत भाजपाचा भगवा झेंडा फडकेल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला होता.

काय म्हणाले संजय राऊत?

देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांसमोर अशी विधाने करु शकतात, भाजपाला वाटत असेल आता जो छत्रपतींचा भगवा फडकत आहे तो शुद्ध नाही आणि ते जे कोणता भगवा फडकवणार असेल तो शुद्ध आहे याचा निर्णय जनता ठरवेल, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी राज्यात १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिलं आहे. जेव्हा जेव्हा दिल्लीकडून मुंबईची कुंचबणा झाली आहे तेव्हा तेव्हा मराठी माणूस रस्त्यावर उतरला आहे, त्यात शिवसैनिक आघाडीवर आहे. हा इतिहास भाजपाने चाळला पाहिजे, या लोकांना मुंबई महाराष्ट्रात ठेवायची नाही. मुंबईत येणाऱ्या उद्योगपतींना हुसकावून त्यांच्या राज्यात नेतात, मुंबईचं महत्त्व कमी करतायेत त्यावर भाजपा नेते बोलत नाही, मुंबई ओरबडायची असेल तर त्याला आमचा विरोध आहे, १०० पिढ्या आल्या तरी मुंबई महापालिकेवर भगवा उतरवायचं सोडा पण हात लावण्याचीही हिंमत नाही नाही, कारण या भगव्यात आग आहे असं संजय राऊत म्हणाले होते.

भाजपाला सत्तेत येण्यासाठी ५ वर्ष स्वप्न पाहावं लागेल

सत्तेवर येण्यासाठी भाजपाला ५ वर्ष स्वप्न बघतच काढायची आहे आणि ५ व्या वर्षी पुन्हा एकदा भाजपाचं स्वप्नभंग होणार आहे, सत्तेविना भाजपा अस्वस्थ झाली आहे, त्यामुळे कार्यकर्ते कुठेही जाऊ नये यासाठी भाजपा नेत्यांना सत्ता येणार असल्याची विधान करावी लागतात. पुढचं सरकार दिवसाढवळ्या येईल तेदेखील शिवसेनेचे असेल असा टोला अनिल परब यांनी भाजपाला लगावला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाट आली तरी सरकार सज्ज

कोरोनाचं संकट राज्य आणि देशासमोर आहे, कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची जी काळजी घेतली त्याचं जगानं कौतुक केले आहे. काळजी घेणं आपल्याला गरजेचे आहे, लॉकडाऊन करावं या मताचं सरकार नाही, उद्या कोरोनाची लाट आली तर त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तयार केली आहे. कोरोना लाट आली तर कडक निर्बंध करावे लागतील. विविध अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन यंत्रणा सुसज्ज ठेवली आहे. कोरोना कसा हाताळायचा हे माहिती झाल्याने त्यासाठी पूर्ण तयारी आहे अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

Web Title: "MNS can't work without taking betel nut"; criticism of Shiv Sena minister Anil Parab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.