हावडा (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या जनतेच्या कल्याणाऐवजी फक्त स्वत:च्या भाच्याच्या कल्याणासाठी काम करीत आहेत, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी येथे केला. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सभेत ते बोलत होते.राज्यात विधानसभा निवडणुकीच्या वेळी ममता बॅनर्जी यांच्या बाजूने कोणीही असणार नाही, असे शहा म्हणाले. तृणमूल काँग्रेसचा कार्यक्रम म्हणजे भाचा अभिषेक बॅनर्जीला मुख्यमंत्री करण्याचा आहे, असे ते म्हणाले. तृणमूल काँग्रेसमधून ज्या संख्येने नेते बाहेर पडत आहेत त्याकडे लक्ष वेधून शहा म्हणाले की, ‘राज्यात विधानसभा निवडणूक घेतली जाईल तेव्हा ममता बॅनर्जी एकट्या पडलेल्या दिसतील.’ राज्यात २९४ जागांसाठी येत्या एप्रिल-मेमध्ये निवडणूक घेतली जाईल. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या स्थापनेवेळी सदस्य असलेल्या अनेक नेत्यांपैकी एक बानी सिंघा राय यांनी या मेळाव्यात भाजपमध्ये प्रवेश केला. अमित शहा म्हणाले, तृणमूल काँग्रेसची ‘मा, माटी, मानुष’ ही घोषणा आता ‘हुकूमशाही, खंडणी आणि लांगूलचालन’ अशी बनली आहे.
ममता बॅनर्जींचे काम फक्त भाच्याच्या कल्याणासाठी, गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 04:35 IST