CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha:भाजप आमदाराकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख; देवेंद्र फडणवीसांकडून लगेच दिलगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 16:52 IST2021-03-03T16:48:57+5:302021-03-03T16:52:10+5:30
Maharashtra Budget Session : मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान त्यांच्या नावाचा एका सदस्याकडून एकेरी उल्लेख

CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha:भाजप आमदाराकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख; देवेंद्र फडणवीसांकडून लगेच दिलगिरी
सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्यात आली. सुरूवातीला अभिभाषणावरून बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणादरम्यानही विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.
या गोंधळादरम्यान विरोधी पक्षातील एका नेत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला. यानंतर सभागृहात वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सत्ताधाऱ्यांनीही यावर आक्षेप घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपलं भाषण थांबवलं आणि संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी आपली हरकत नोंदवली.
यावेळी त्यांनी विरोधी पक्षाच्या कोणत्याच नेत्याच्या भाषणादरम्यान व्यत्यय आणला नाही. त्यामुळे तशीच अपेक्षा आताही असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख ही गंभीर बाब असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच याबाबत समज देण्यात यावी अशी विनंतही त्यांनी केली. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित उभं राहत जर मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला असेल तर मी दिलगीरी व्यक्त करतं असं म्हटलं. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांनी आपलं भाषण सुरू केलं.
विरोधकांना टोला
"राज्यपाल कोश्यारींनी राज्य सरकारच्या कामगिरीची माहिती त्यांच्या अभिभाषणातून दिली. त्यांनी सरकारचं कौतुक केलं. ते पचवणं अनेकांना जड गेलं. कारण ते कौतुक अनपेक्षित होतं. राज्यपाल म्हणजे व्यक्ती नाही, ती संस्था आहे, असं विरोधक म्हणतात. त्यामुळेच त्यांचं भाषण महत्त्वाचं आहे. राज्यपाल मराठीत बोलले हेही नसे थोडके," असं मुख्यमंत्री म्हणाले. मी कोरोना काळातला सगळा हिशोब देतो. तुम्ही केंद्राकडून पीएम केअर्सचा हिशोब मागणार का, असा सवाल त्यांनी विरोधकांनी केला. तुम्ही माझ्याकडे हिशोब मागू शकता. पण पीएम केअर्सची माहिती आरटीआयमध्येही येत नाही आणि काही विचारलं तर तो देशद्रोह ठरतो. ही यांची लोकशाही, असं म्हणत त्यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला.