Lok Sabha Election 2019: Sunny Deol to give BJP a chance? | Lok Sabha Election 2019: सनी देओलला भाजपा देणार संधी?
Lok Sabha Election 2019: सनी देओलला भाजपा देणार संधी?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत काहीही करून ३०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या प्रयत्नांतील भाजपा चित्रपट कलावंत, कादंबरीकार, सामाजिक कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याच्या विचारात आहे. मुंबईत अभिनेत्री माधुरी दीक्षित व अभिनेते नाना पाटेकर यांच्या नावाची चर्चा आहे तर उत्तर प्रदेशात मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी अभिनेते सनी देओल यांना संधी देण्याच्या विचार होत आहे. त्यासाठी पक्षाचे काही नेते देओल यांच्या संपर्कात आहेत. सध्या देओल संमती देण्याबद्दल द्विधा मन:स्थितीत आहेत.

पश्चिम उत्तर प्रदेशातून एका जागेवर देओल यांना उमेदवारी देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. येथे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात प्रत्येकी आठ जागांसाठी मतदान होईल. पहिल्या टप्प्यात ज्या जागांसाठी मतदान होईल त्या मतांच्या ध्रुवीकरणासाठी महत्वाच्या आहेत. येथील मुजफ्फरपूर, बागपत, मेरठ हे मतदारसंघ राष्ट्रभक्तीच्या मुद्यावर एकगठ्ठा मतांसाठी परिचीत आहेत. सनी देओल यांना राष्ट्रीय लोकदलचे अध्यक्ष अजित सिंह यांचे चिरंजीव जयंत चौधरी यांच्याविरुद्धही उभे केले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. सनी देओल जाट असून ते ‘गदर- एक प्रेमकथा’ ‘इंडियन’ या चित्रपटांतून देशभक्त नायक म्हणून प्रेक्षकांना चांगले परिचित आहेत. पाकिस्तानात नुकत्याच करण्यात आलेल्या हवाई कारवाईमुळे जे देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे त्या पार्श्वभूमीवर सनी देओलचा लाभ पक्षाला होऊ शकतो.
सनी देओल यांना निवडणुकीच्या रिंगणात आणण्याचा आमचा प्रयत्न असला तरी ते स्वत: गर्दी व झगमगाटापासून दूर राहणारे आहेत. त्यामुळे त्यांची संमती अजून मिळालेली नाही. आम्ही त्यांच्या वडिलांशी (धर्मेंद्र) याबद्दल बोलत आहोत. अभिनेते अक्षय कुमारदेखील भाजपाकडून रिंगणात उतरवले जाऊ शकतात. त्यांच्यावर सरकारच्या धोरणांचा परिणाम झाला आहे. निवडणूक लढायची की नाही हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. त्यांची संमती असेल तर पक्षात क्वचितच त्यांना विरोध होईल, असे दुसऱ्या पदाधिकाºयाने सांगितले. उत्तर प्रदेशातील पिलिभीत मतदार संघाऐवजी मेनका गांधी करनालमधून निवडणूक लढवू इच्छितात. त्यांचा मुलगा वरूण गांधी याच्यासाठी पिलिभीत मतदारसंघ मिळणार असेल तर मी मतदारसंघ बदलायला तयार आहे, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यांचे प्राधान्य करनालऐवजी कुरुक्षेत्रला आहे.

वसुंधराराजे यांच्या जागेबद्दल संभ्रम
राजस्थानात वसुंधरा राजे यांच्या जागेबद्दल संभ्रम आहे. त्यांचा प्रयत्न त्यांचा मुलगा दुष्यंत याला झालावाडमधून उमेदवारी देण्याचा आहे. पण भाजपा त्यांना तुम्हीच तेथून लढा, असे म्हणत आहे. निवडणुकीत वसुंधरा राजे यांना नाराज करून कोणतीही जोखीम भाजपाला घ्यायची नाही, असे समजते. परंतु, झालावाडमधून कोण लढणार हा पेच कायम आहे.


Web Title: Lok Sabha Election 2019: Sunny Deol to give BJP a chance?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.