'मोदी जिंकताहेत' ही तर विरोधकांची अफवा; विश्वास ठेवू नका- पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 13:40 IST2019-04-29T13:37:59+5:302019-04-29T13:40:14+5:30
झारखंडमधील सभेत मोदींचं जनतेला आवाहन

'मोदी जिंकताहेत' ही तर विरोधकांची अफवा; विश्वास ठेवू नका- पंतप्रधान
रांची: देशातल्या 9 राज्यांमध्ये विधानसभेच्या 71 जागांसाठी मतदान सुरू आहे. एका बाजूला चौथ्या टप्प्याचं मतदान सुरू असताना दुसऱ्या बाजूला पुढील टप्प्यांसाठी राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडच्या कोडरमामध्ये आले होते. तीन टप्प्यातल्या मतदानानंतर विरोधक भांबावून गेले आहेत. आता चौथ्या टप्प्यानंतर ते चारीमुंड्या चीत होतील, अशा शब्दांमध्ये मोदींनी विरोधकांवर तोफ डागली.
विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना केलं. 'मोदी जिंकत आहेत. त्यामुळे त्यांना मतदान करण्याची गरज नाही, असं विरोधक म्हणत आहेत. मात्र त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन मी करतो. मोदी जिंकत असतील, तर भरपूर मतदान करा आणि अधिकाधिक मतांनी त्यांना जिंकवा,' असं मोदी जनसभेला संबोधित करताना म्हणाले. याआधीही मोदींनी त्यांच्या सभेत अनेकदा अशा प्रकारे आवाहन केलं होतं.
आम्ही निवडणूक जिंकत आहोत. मात्र प्रत्येक ठिकाणी कमळ उमलायला हवं. त्यामुळे नक्की मतदान करा. जेव्हा आमच्या सरकारनं भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली तेव्हा विरोधक चौकीदाराला चोर म्हणू लागले. विरोधकांचं मिशन महाभेसळ सुरू आहे. खिचडी सरकार स्थापन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. घोटाळे करता यावेत, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, असं मोदी म्हणाले. देशात खिचडी सरकार आल्यास देश मागे जाईल. त्यामुळे देशात सशक्त सरकार आणा, असं आवाहन मोदींनी केलं.