होऊ दे खर्च... पण महापौर आपलाच झाला पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:48 AM2021-02-21T04:48:24+5:302021-02-21T11:28:17+5:30

घोडेबाजारात बोली लागते. किंमत ठरते. ती कधी रोकड्यात असते, तर कधी पुढच्या पदांचं गाजर दाखवलं जातं. एकदा ठरलं की, नाराजांना आणि आपल्या सोबत येणाऱ्यांना उचललं जातं.

Sangli Miraj Corporation Mayor elections Political Happenings between NCP, BJP, Congres | होऊ दे खर्च... पण महापौर आपलाच झाला पाहिजे

होऊ दे खर्च... पण महापौर आपलाच झाला पाहिजे

Next

श्रीनिवास नागे

अडीच वर्षांत तीन-तीन महापौर आणि उपमहापौर. प्रत्येकाला दहा महिने. ‘मटकाकिंग’ जसा आकडे जाहीर करतो, तशी म्हणे बंद लिफाफ्यातून नावे येतात. जी नावे बाहेर पडतात, त्यांचे मुखडे खुलतात. खुलणारच ना... जुळणीच तशी असते! अपेक्षाभंग झालेले तोंड पाडून बसतात. लगेच ‘नॉट रिचेबल’ होतात. मग सुरू होतो मिनतवारीचा खेळ तथा घोडेबाजार! तो थेट मतदानापर्यंत चालतो. यंदा सांगली महापालिकेत हे अनुभवायला मिळतंय.

घोडेबाजारात बोली लागते. किंमत ठरते. ती कधी रोकड्यात असते, तर कधी पुढच्या पदांचं गाजर दाखवलं जातं. एकदा ठरलं की, नाराजांना आणि आपल्या सोबत येणाऱ्यांना उचललं जातं. पर्यटनस्थळावरचं रिसॉर्ट किंवा पॉश फार्म हाऊसवर रवाना केलं जातं. निवडणुकीपर्यंत सगळी बडदास्त राखली जाते. मग थेट निवडणुकीच्या मतदानावेळीच आरामबस किंवा मोटारीतून आणलं जातं. मागेपुढे हत्यारबंद पैलवानांच्या जीपगाड्या. हवं तसं मतदान करवून घेतलं जातं... राज्यातल्या बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांच्या निवडणुकांत हेच चालतं. शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यात महापालिका आणि गोकूळ दूध संघाच्या पदाधिकारी निवडीत तर हा पायंडाच पडलेला. तिथल्या आप्पांची महापालिका आणि गोकुळवर हुकूमत होती. ती जरब याच ‘स्टाईल’नं तयार झालेली; पण पुढं त्या ‘स्टाईल’ला सुरूंग लागला. मनी-मसल पॉवरवाल्यांची दुसरी टोळी आली. टोळीयुद्ध भडकलं. आप्पांची काही सत्तास्थानं उद्ध्वस्त झाली...

आता तोच पॅटर्न कोल्हापूरचे दादा सांगलीत आणताहेत. दादांनी नवस-सायास करून सांगलीच्या महापालिकेत कमळ फुलवलं. काठावरची का होईना, पण सत्ता आणली. राज्यातल्या सत्तेच्या चाव्या हातात असल्यानं, तळ्यात-मळ्यात करणाऱ्यांना तंबूत आणलं. आधीच्या सत्ताधाऱ्यांनी वापरलेले ‘फॉर्म्युले’ वापरले. मुळातच गब्बर असलेल्या आयारामांचं महत्त्व आपोआप वाढलं आणि निष्ठावान बाजूला पडले. त्यात पुन्हा आधी आणि नंतर आलेल्या आयारामांच्या कुरबुरी सुरू झाल्या.

यंदा मात्र दादांनी कहरच केला. महापौरपद खुलं झालं आणि गुडघ्याला बाशिंग बांधलेले बाहुबली पुढं सरसावले. नाराजी थोपविण्यासाठी आणि सत्ता टिकविण्यासाठी अडीच वर्षांत तीन-तीन महापौर आणि उपमहापौर करण्याचं दादांनी जाहीर केलं; पण पहिला नंबर कोणाचा, यावरून परत घमासान! अखेर पैलवानांच्या पुतण्याला संधी मिळाली. त्यांचे ‘साथीदार’ सुखावले; पण कमळाच्या तंबूचे खांब हलू लागले. पैलवानांच्या पुतण्याची उपमहापौरपदाची कारकीर्द संपून वर्ष व्हायच्या आधीच पुन्हा महापौरपदाचं तिकीट. त्यांच्यासोबत उपमहापौरपदासाठी कुपवाडकरांना ‘गजानना’चा प्रसाद देण्याचं घोषित केलं. बाकीचे इच्छुक आणि त्यांचे ‘गाॅडफादर’ अस्वस्थ झाले. कुणकुण लागली होतीच; पण नावं बाहेर येताच बाराजण ‘नॉट रिचेबल’ झाले. त्यातले तिघं सापडले, पण बाकीचे नऊ गायब झालेत म्हणे! गेले दोन दिवस जामवाडी, पटेल चौक, त्रिमूर्ती थिएटर इथली साथीदार ग्रुपची जनसंपर्क कार्यालयं रात्री उशिरापर्यंत गजबजलेली दिसतात. दीड-दोनशे पोरं, गाड्या रस्त्यावर आलेली. आदेशाची वाट बघत थांबलेली. सगळे हिशेबात गढून गेलेले. चेहऱ्यावर शंका-कुशंकांचं जाळं.

----------------------

तिकडं मिरजेत ‘ओन्ली बापूं’च्या बंगल्यावर आणि बागवानांच्या कार्यालयातही हीच लगबग. सांगलीत विजय बंगल्यासह पृथ्वीराजबाबांच्या बंगल्यावर वेगवेगळ्या बैठका सुरू झाल्यात. मुंबईतून बाळासाहेबांचा सल्ला घेतला जातोय. सांगली साखर कारखान्याच्या गेस्ट हाऊसवरही वर्दळ वाढलेली, तर मार्केट यार्डशेजारच्या वसंत कॉलनीतील बंगल्यात बजाज कंपनीची वेगळीच खलबतं चाललेली. कधी मुंबईच्या नेपियन्सी रोडवरच्या हिल साईड बिल्डिंगवर, तर कधी मलबार हिलवरच्या ‘नंदनवन’वर फोनाफोनी सुरू असलेली. एखादा फोन चिंचणीत काकांनाही जातो! महापालिकेतल्या तत्कालीन महाआघाडीचे काही शिलेदार एकत्र येताहेत. सूत्रधार : अर्थातच इस्लामपूरकर साहेब.

----------------------

‘होऊ दे खर्च... काहीही करायला लागू दे... पण सीट सोडायची नाही!’ असं फर्मान दादांनी काढलंय म्हणे. काल सांगलीत म्हणे पेठनाक्यावरूनही रसद आलीय. दोन दिवस धुरळा. त्या नऊजणांची हुडकाहुडकी आणि घोडेबाजाराची चलती...

पण दादा, हा पॅटर्न सांगलीत कशाला? पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आणि परवाच मिरज पंचायत समितीच्या उपसभापती निवडीत सांगली-मिरजकरांनी दाखवलेला इंगा विसरलात की काय? घोड्यांवर खुर्दा उधळणाऱ्यांना सांगली-मिरजकर ‘विकून’ येतात, हा इतिहास जुना नाही!

Web Title: Sangli Miraj Corporation Mayor elections Political Happenings between NCP, BJP, Congres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.