"मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहिले तर भाजपाला महाराष्ट्रात राजकारण करणे महागात पडेल!"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 16:27 IST2021-01-28T16:25:31+5:302021-01-28T16:27:19+5:30
Sachin Sawant : मुंबईची जनता भाजपाचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असेही सावंत सावंत म्हणाले.

"मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहिले तर भाजपाला महाराष्ट्रात राजकारण करणे महागात पडेल!"
मुंबई : मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश करावा अशी सीमा भागातील जनतेची मागणी असून तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित घोषित करावे, या कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या विधानाचा काँग्रेसने तीव्र निषेध केला असून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्र शासित करण्याचा भाजपाचा कुटील डाव उघड झाला आहे. परंतु भाजपाने मुंबईकडे वाकड्या नजरेने जरी पाहिले तर महाराष्ट्रात राजकारण करणे त्यांना महागात पडेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिला आहे.
लक्ष्मण सवदी यांच्या विधानातून केंद्रातील मोदी सरकाराचा कुटील डाव स्पष्ट झालेला आहे. मुंबईला कमकुवत करण्याचा, मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे, महाराष्ट्राला बदनाम करण्याचे भाजपाचे षडयंत्र राहिले आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातमध्ये हलवण्याचा, मुंबईतील उद्योगधंदे व प्रकल्प गुजरात व इतरत्र हलवण्याचे काम मागील सहा वर्षापासून बिनदिक्कतपणे सुरु असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र गप्प बसून होते. मुंबईला केंद्रशासित करण्याचा हा डाव होता, असे सचिन सावंत म्हणाले.
मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याचा भाजपा आणि मोदी सरकारचा कुटील डाव उघड झाला आहे. मुंबईकडे वाकड्या नजरेने बघितले तर भाजपावाल्यांनो महाराष्ट्रात तुम्हाला राजकारण करणे कठीण होईल. महाराष्ट्राची जनता तुम्हाला माफ करणार नाही https://t.co/V6cVB7FZCxpic.twitter.com/RRgVSBMY1b
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 28, 2021
याचबरोबर, कधी सीबीआय, एनसीबी, आयकर विभाग या केंद्रीय यंत्रणांकडून येथील उद्योग- व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भिती निर्माण केली जात आहे, बॉलिवूडचाही छळ मांडला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनीही बॉलिवूड उत्तर प्रदेशात हलवण्यासाठी केलेले प्रयत्न हे असेच सुरु झालेले नाहीत. या घटनातून भाजपाचा कुहेतू पद्धतशिरपणे सुरु होता हे स्पष्ट दिसते. मोदी व भाजपाला महाराष्ट्राबद्दल इतका आकस का आहे, हा प्रश्न विचारून १०५ हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही. तसेच मुंबईची जनता भाजपाचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असेही सावंत सावंत म्हणाले.