मनसेकडून विधानसभेची पायाभरणी? लोकसभा निवडणुकीत ताकदीची चाचपणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 12:59 AM2019-04-26T00:59:37+5:302019-04-26T06:49:30+5:30

इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित

Foundation for foundation stone of MNS? | मनसेकडून विधानसभेची पायाभरणी? लोकसभा निवडणुकीत ताकदीची चाचपणी

मनसेकडून विधानसभेची पायाभरणी? लोकसभा निवडणुकीत ताकदीची चाचपणी

Next

ठाणे : गेल्या १० वर्षांत मनसेला ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे महापालिकेत केवळ सात नगरसेवक निवडून आणता आले होते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाच्या मतांची कमाई करणाºया राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदा लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार दिला नसला, तरी राज यांनी राज्यात जाहीर सभांचा लावलेला धडाका पाहता आणि ठाण्यात एक दिवसाचा मुक्काम पाहता विधानसभेची ही पायाभरणी असल्याने ठाण्यामधून इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

राज्यात मनसेला सर्वाधिक यश नाशिक शहरात मिळाले होते. तशीच मोर्चेबांधणी त्यांनी ठाण्यातही केली होती. त्यानुसार, २००९ मध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघात मनसेला तिसºया क्रमांकाची मते मिळाली होती. तर, विधानसभा निवडणुकीतही मनसेला तिसºया क्रमांकाची मते मिळाली होती.



त्यानंतर, २०१२ च्या महापालिका निवडणुकीत तब्बल सात नगरसेवक निवडून आणून सत्ता स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. परंतु, मागील काही वर्षांत मनसेची अधोगती झाली. २०१४ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांनी सपाटून मार खाल्ला. तर, २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मनसेला भोपळासुद्धा फोडता आला नाही. आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी एकही उमेदवार न देता भाजपला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी राज्यात जाहीर सभांचा लावलेला एकूणच धडाका आणि ‘लाव रे तो व्हिडीओ’ यामुळे सोशल माध्यमातून मनसेचा बोलबाला सुरू आहे. सत्ताधारी भाजपनेही राज यांच्या सभांचा धसका घेतला आहे.



राज यांच्या सभांना राज्यभर मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता मरगळलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र चैतन्य निर्माण झाले असून येत्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 
विधानसभेत मनसे साºया शक्तिनिशी उतरण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत असल्याने विधानसभा निवडणूक रंगतदार ठरण्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहापैकी किमान दोन विधानसभा मतदारसंघांत चमत्कार घडवू शकते, इतकी ताकद पक्षाच्या मतांमध्ये आहे.

मनसेला कुठे आहे स्थान?
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा मतदारसंघांतून मनसेने
तिसºया क्रमांकाची मते मिळवली होती. २०१४ च्या निवडणुकीत मात्र मनसेचा दारुण पराभव झाला होता. परंतु, आता पुन्हा मनसेचे इंजीन सुसाट निघाले आहे.
आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची काय रणनीती असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून असून ठाण्यातून काही दुरावलेले पदाधिकारीही स्वगृही परतण्याचा दावा मनसेच्या नेत्यांनी केला आहे.

आघाडी करणार?
राज यांनी अद्याप काँग्रेस आघाडीत जाण्यासंबंधी कोणताही निर्णय अथवा संकेत दिले नसले, तरी आघाडीसोबत मनसे जाण्याची शक्यताही व्यक्त होत असल्याने मनसेच्या इच्छुकांचे आघाडीच्या नेत्यांशी सूत जुळू लागलेले दिसून येत आहे. त्यामुळे आतापासूनच त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Web Title: Foundation for foundation stone of MNS?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.