"ओबीसी आरक्षणासाठी बारा काय १०६ आमदारांचे निलंबन झालं तरी संघर्ष करत राहू,’’ देवेंद्र फडणवीसांचा आक्रमक पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 16:47 IST2021-07-05T16:32:53+5:302021-07-05T16:47:19+5:30
Devendra Fadnavis News: ओबीसी आरक्षणावरून सभागृहात आणि तालिका अध्यक्षांच्या चेंबरमध्ये सत्ताधारी भाजपाच्या आमदारांनी गोंधळ घातला. यावेळी, धक्काबुक्की आणि शिविगाळ झाल्याचा ठपका ठेवत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन केले आहे.

"ओबीसी आरक्षणासाठी बारा काय १०६ आमदारांचे निलंबन झालं तरी संघर्ष करत राहू,’’ देवेंद्र फडणवीसांचा आक्रमक पवित्रा
मुंबई - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज विधानसभेमध्ये अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. ओबीसी आरक्षणावरून सभागृहात आणि तालिका अध्यक्षांच्या चेंबरमध्ये सत्ताधारी भाजपाच्या आमदारांनी गोंधळ घातला. यावेळी, धक्काबुक्की आणि शिविगाळ झाल्याचा ठपका ठेवत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन केले आहे. या कारवाईवरून भाजपा आक्रमक झाली असून, कामकाजावर बहिष्कार घातल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. ( "Even if 126 MLAs are suspended for OBC reservation, we will continue to fight," said Devendra Fadnavis.)
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्हाला ज्या गोष्टीची शंका होती ती सरकारने खरी केली. ओबीसी आरक्षणावरून सरकारला आम्ही उघडं पाडलं. आमच्या १२ आमदारांना खोटे आरोप करून निलंबित केले. मात्र मी एक स्पष्ट करू इच्छितो की, ओबीसी आरक्षणाकरिता १२ काय १०६ आमदारांना निलंबित केलं तरी आम्ही संघर्ष करत राहू. ओबीसी आरक्षणासाठी आम्ही एक वर्ष नाही तर पाचही वर्ष निलंबन झालं तरी पर्वा करत नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका मांडली.
फडणवीस पुढे म्हणाले की, आधीही लोक मंचावर चढले होते. अनेकदा दालतान बाचाबाची होते, पण कुणी सस्पेंड होत नाही. आजसुद्धा असाच प्रकार घडला मात्र भाजपाच्या आमदाराने शिवी दिलेली नाही. आता माझ्यावर उद्या हक्कभंग आणला तरी चालेल. मात्र मी स्पष्टपणे सांगतो की, याबाबत स्टोरी तयार करण्यात आली. तिथे शिव्या कुणी दिल्या, हे सर्वांना पाहिलंय. शिवसेनेचे सदस्य तिथे आल्यानंतर वाद झाला. त्यानंतर आमचे सदस्यही आक्रमक झाले. मात्र आम्ही वाद वाढू दिला नाही. मी स्वत: अनेकांना रोखले. त्यानंतर आशिष शेलार यांनी सर्वांच्या वतीने तालिका अध्यक्षांची माफी मागितली. मग भास्कर जाधव यांनी आशिष शेलार, गिरीश महाजन यांची गळाभेट घेतली. मात्र नंतर सभागृहात तालिका अध्यक्षांनी आमच्या आमदारांचे निलंबन केले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.