मध्य प्रदेशमधील पोटनिवडणुकीपूर्वी शिंदें गटाच्या दोन मंत्र्यांनी दिला सरकारमधून राजीनामा
By बाळकृष्ण परब | Updated: October 21, 2020 15:51 IST2020-10-21T15:48:21+5:302020-10-21T15:51:29+5:30
Madhya by-election News : मध्य प्रदेशमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीला काही दिवस राहिले असतानाच शिवराज सिंह चौहान सरकारमधील ज्योतिरादित्य शिंदे गटाच्या दोन मंत्र्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

मध्य प्रदेशमधील पोटनिवडणुकीपूर्वी शिंदें गटाच्या दोन मंत्र्यांनी दिला सरकारमधून राजीनामा
भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये सध्या विधानसभेच्या २८ जागांसाठीच्या पोटनिवडणुकीची धामधूम सुरू आहे. या पोटनिवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससह अनेक लहानमोठे पक्ष रिंगणात आहेत. या पोटनिवडणुकीच्या मतदानाला काही दिवसच शिल्लक राहिले असताना एक मोठी बातमी आली आहे. पोटनिवडणुकीला काही दिवस राहिले असतानाच शिवराज सिंह चौहान सरकारमधील ज्योतिरादित्य शिंदे गटाच्या दोन मंत्र्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
ज्योतिरादित्य शिंदे गटाच्या तुलसी सिलावट आणि गोविंद राजपूत यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. सभागृहाचे सदस्यत्व नसतानाही मंत्रिपदाच्या कार्यकाळाचे सहा महिने पूर्ण झाल्याने या दोन्ही मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारून ते राज्यपालांकडे पाठवले आहेत. तुलसी सिलावट आणि गोविंद राजपूत हे ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये दाखल झाले होते. तसेच ते पोटनिवडणुकही लढवत आहेत.
सभागृहाचे सदस्यत्व असल्याशिवाय कुठलीही व्यक्ती सहा महिन्यांहून अधिक काळ मंत्रिपदावर राहू शकत नाही, अशी घटनात्मक तरतूद आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास संबंधित व्यक्तीस राजीनामा द्यावा लागतो. या नियमानुसारच या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.
सांवेर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपाचे तुलसीराम सिलावट आणि काँग्रेसचे प्रेमचंद गुड्डू यांच्यात मुख्य लढत होणार आहे. सांवेर येथून चार वेळा आमदार राहिलेले तुलसी सिलावट हे यावेळी भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी भाजपा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.