eknath khadse will not leave party says bjp leader chandrakant patil | नाराज एकनाथ खडसे भाजप सोडणार, राष्ट्रवादीत जाणार?; चंद्रकांत पाटील म्हणतात...

नाराज एकनाथ खडसे भाजप सोडणार, राष्ट्रवादीत जाणार?; चंद्रकांत पाटील म्हणतात...

कोल्हापूर: भाजपवर बऱ्याच कालावधीपासून नाराज असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. खडसे लवकरच हातावर घड्याळ बांधणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र खडसे पक्ष सोडणार नाहीत, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. एकनाथ खडसे हे भाजपचे ज्येष्ठ आणि जुने-जाणते नेते आहेत. पक्षानं आतापर्यंत त्यांना भरभरून दिलं आहे. त्यामुळे भाजपचं नुकसान होईल अशी कोणतीही भूमिका ते घेणार नाहीत,' असं पाटील म्हणाले.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिल्यानं काल राज्य सरकारनं समाजासाठी काही निर्णय घेतले. त्याबद्दल बोलण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेवरही भाष्य केलं. पक्षाचं नुकसान होईल अशी कोणतीही भूमिका खडसे घेणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खडसेंचा विचार म्हणजे अंबुजा सिमेंटची दिवार, दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही; भाजपा नेत्याचा दावा

पक्षात सातत्यानं डावललं जात असल्याची एकनाथ खडसे यांची भावना आहे. ही भावना अनेकदा बोलून दाखवली आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आधी अप्रत्यक्ष टीका करणारे खडसे गेल्या काही दिवसांपासून थेट हल्ले चढवत आहेत. काल आलेले लोक आम्हाला अक्कल शिकवत आहेत, असा टोला त्यांनी काही दिवसांपूर्वी हाणला होता. 'भाजपची सत्ता जाण्यासाठी 'मी पुन्हा येईन' ही घोषणा जबाबदार आहे का याचा अभ्यास मी करतोय, असं खोचक विधान त्यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं.

भाजपाचा मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?; खासदार शरद पवारांची महत्त्वाची बैठक सुरु

उत्तर महाराष्ट्रातील काही नेते व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यात खडसे यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे. याबद्दल चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता, खडसे असं काही करणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 'नाथाभाऊंबद्दल यापूर्वीही अनेकदा अशा चर्चा झाल्या होत्या. मात्र, त्या अफवाच ठरल्या होत्या. आताची चर्चाही अफवाच ठरेल,' असं पाटील म्हणाले.

खडसे पक्षांतर करणार नाहीत- सुधीर मुनगंटीवार
एकनाथ खडसे पक्ष सोडणार नाहीत, असा विश्वास भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही व्यक्त केला. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, माझ्या आयुष्यात राजकारणाची किंवा व्यक्ती समजण्यासाठी थोडी समज असेल तर एकनाथ खडसे दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही. खडसेंचे काम विचारासाठी आहे ते व्यक्तीसाठी नाही. खडसेंना विधानसभा निवडणुकीवेळीही अनेक ऑफर आल्या पण त्यांनी पक्ष सोडला नाही. त्यांच्या विचाराची श्रद्धा ही अंबुजा सिमेंटच्या दिवारासारखी तुट सकती है पण विचारांची श्रद्धा तुटू शकत नाही. संवादाच्या माध्यमातून सगळे प्रश्न सुटतील. आमच्या आधीपासून त्यांनी पक्षासाठी भरपूर काही केलं आहे. त्यांचा त्यागाचा सन्मान आहे. भाजपा पक्ष नाही तर परिवार आहे, असे विचार मनात आणू नका असं त्यांनी सांगितले. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

अ‍ॅक्सिस बँकेत पोलिसांचे पगार वळवले, तो पदाचा सदुपयोग होता का?; खडसेंचा थेट सवाल

एकनाथ खडसे कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे नेते आहेत, जिना यहा मरना यहा इसके सिवा जाना कहा, काही घटनांबद्दल दु:ख असू शकतात. पण खडसे भाजप सोडून इतर पक्षात जाऊच शकत नाही, दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरीही खडसेंना डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊ देत नाही. खडसेंच्या मनाला दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार शिवू शकत नाही असा दावा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

खडसे कमळ सोडणार, घड्याळ बांधणार?
गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रातील हा नेता भाजपात नाराज असल्याची चर्चा आहे. या नेत्याला पक्षात घेतल्यास त्याचा कितपत फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो याची चाचपणी शरद पवार घेत आहेत. यात राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर, आमदार अनिल पाटील यांच्यासोबत आढावा घेण्यात येत आहे. भाजपातून या नेत्याला राष्ट्रवादीत घेण्याबाबत स्थानिक नेत्यांची मते जाणून घेण्यासाठी शरद पवारांनी बैठक बोलावली.

याबाबत मराठी वृत्तवाहिन्यांनी केलेल्या दाव्यानुसार उत्तर महाराष्ट्रात भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे आक्रमकपणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. फडणवीसांनीच माझं तिकीट कापलं, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, आता मी यावर पुस्तक लिहिणार असल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितले होते.
 

Web Title: eknath khadse will not leave party says bjp leader chandrakant patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.