congress sachin sawant slams bjp over sushant singh case aiims report | "एम्सच्या अहवालामुळे भाजपाचं तोंड काळं झालंय, कटकारस्थानांचा झाला पर्दाफाश"

"एम्सच्या अहवालामुळे भाजपाचं तोंड काळं झालंय, कटकारस्थानांचा झाला पर्दाफाश"

मुंबई  - अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं, अशा सूचनादेखील न्यायालयाने केल्या आहेत. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरून सध्या राजकारणही तापलं आहे. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी 'एम्स'ने दिलेल्या अहवालानंतर काँग्रेसनेभाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'एम्स'च्या अहवालामुळे भाजपचं तोंड काळं झालं आहे अशी जोरदार टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केले आहे. "एम्सच्या अहवालामुळे भाजपाचं तोंड काळं झालं आहे. भाजपाच्या कटकारस्थानांचा पर्दाफाश झाला आहे. गुप्तेश्वर पांडे यांना उगाच स्वेच्छानिवृत्ती देण्यात आली नाही. मुंबई पोलिसांना ज्या वाईट पद्धतीने बदनाम करण्यात आलं, महाराष्ट्राचा अपमान केला गेला. ते पाहता महाराष्ट्राची जनता भाजपाला माफ करणार नाही"असं सावंत यांनी म्हटलं आहे.

"मोदी सरकारचं देश पातळीवरचं अपयश लपवण्यासाठी सुशांत प्रकरणात एक षडयंत्र रचलं गेलं"

"एम्सने सुशांत सिंह राजपूत प्रकरणात निर्वाळा दिला की त्याच्या शरीरात कोणतेही विष आढळले नाही. यातून भाजपाचे तोंड काळे झाले आहे. मुंबई व महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी षडयंत्र करण्यामागे भाजपा आणि मोदी सरकारमधील मास्टरमाईंड सीबीआय ने चौकशी करून शोधावे" असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. तसेच "मोदी सरकारचं देश पातळीवरचं अपयश लपवण्यासाठी सुशांत प्रकरणात एक षडयंत्र रचलं गेलं. राजकीय काटकारस्थान करून तीन तपास संस्थांना महाराष्ट्रात आणलं गेलं. संघराज्य चौकटीच्या चिंधड्या उडवल्या गेल्या. राजकारणासाठी बिहार पोलिसांचा वापर केला गेला. मोदी सरकार पुरस्कृत मीडिया ट्रायलचा आम्ही निषेध करतो" असं देखील ट्विटमध्ये  म्हटलं आहे. 

"महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपाचा हीन डाव अखेर उघड"

अभिनेता सुशांतसिंग प्रकरणाचा वापर करुन महाराष्ट्राला बदनाम करत राष्ट्रीय महत्व कमी करण्याचा भाजपाचा डाव उघड झाला आहे. या कटाचा एक भाग असलेले बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी व्हीआरएससाठी अर्ज केला असून तो तात्काळ मंजूरही करण्यात आला आहे. या पांडेंना लवकरच भाजपाकडून मोठे बक्षीस मिळू शकेल यात शंका नाही. सुशांतनंतर आता बॉलिवूडला टार्गेट करण्याचे षडयंत्र रचले आहे, अशी टीका सचिन सावंत यांनी याआधी केली आहे.

"भाजपाला सुशांतसिंगबदद्ल काही आत्मियता नाही मात्र त्याच्या मृत्यूचा वापर बिहार निवडणुकीसाठी" 

भाजपाला सुशांतसिंगबदद्ल काही आत्मियता नाही मात्र त्याच्या मृत्यूचा वापर बिहार निवडणुकीसाठी आणि महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी करता येऊ शकतो हे पाहून त्यांनी या संधीचा वापर करुन घेतला. देश पातळीवर मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी व लोकांचे लक्ष मुख्य समस्यांपासून दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाने या मुद्द्यांचा वापर केला. आता बॉलिवूडला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशात भव्य चित्रपटसृष्टी उभी करण्याची घोषणा केली हा काही निव्वळ योगायोग नाही, असं ही सावंत म्हणाले होते. 

English summary :
congress sachin sawant slams bjp over sushant singh case aiims report

Web Title: congress sachin sawant slams bjp over sushant singh case aiims report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.