"चंद्रकांत पाटलांच्या मागणीला पाठींबा, मोदींना राजीनामा द्यायला सांगून निवडणुका घ्यायला सांगा"
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 15:59 IST2021-05-19T15:54:49+5:302021-05-19T15:59:31+5:30
Nana Patole : नाना पटोले यांनी साधला निशाणा. निवडणुका घेतल्यास लोकांच्या मनात काय आहे हे समजेल, पटोले यांचं वक्तव्य

"चंद्रकांत पाटलांच्या मागणीला पाठींबा, मोदींना राजीनामा द्यायला सांगून निवडणुका घ्यायला सांगा"
"पंतप्रधान मोदींना बदनाम करण्याचं षड्यंत्र रचण्यात येत असून उद्या निवडणुका घेतल्या तर मोदींना ४०० पेक्षा अधिक जागा मिळतील," असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला होता. यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी टोला लगावला. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
"भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलच लोकसभा निवडणूक घेण्याची मागणी करत आहेत, याचाच अर्थ मोदी अपयशी ठरले आहेत हे आता भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कळून चुकले आहे. मोदींचा राजीनामा घेऊन गडकरींना पंतप्रधान करावे अशी मागणी भाजपाचेच काही नेते करत आहेत. चंद्रकांत पाटलांच्या मागणीला आमचा पाठिंबा असून त्यांनी मोदींना राजीनामा द्यायला सांगून निवडणुका घ्यायला सांगाव्यात. म्हणजे देशातील जनतेच्या मनात काय आहे आणि कोणाच्या किती जागा येतील ते ही कळेल," असा टोला नाना पटोले यांनी लगावला.
LIVE: प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले यांची पत्रकार परिषद https://t.co/oR5SWgKvwW
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) May 19, 2021
काय म्हणाले होते पाटील?
देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत मंगळवारी भाजपची मराठा आरक्षणविषयक बैठक झाली. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना काँग्रेसचं 'कथित' टूलकिट आणि राहुल गांधी पंतप्रधान मोदी यांच्यावर करत असलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना आजही निवडणुका जिंकू, असा विश्वास व्यक्त केला. 'पंतप्रधान मोदींना बदनाम करण्याचं षड्यंत्र रचण्यात येत असून उद्या निवडणुका घेतल्या तर मोदींना ४०० पेक्षा जागा मिळतील,' असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.