"CM will not forgive anyone who made a mistake", Shiv Sena MP Vinayak Raut on Sanjay Rathod Poharadevi matter | "जो कोणी चुकला असेल त्याला मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत" 

"जो कोणी चुकला असेल त्याला मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत" 

ठळक मुद्दे'संजय राठोड प्रकरणात भाजपाने केलेले आरोप चुकीचे आहेत. भाजपाकडे आरोप करण्यापलीकडे दुसरे काहीच उरले नाही'

रत्नागिरी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून (Pooja Chavan Suicide Case) सध्या राजकीय वातावरण तापले आहे. यातच, याप्रकरणी कथित आरोप असणारे ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी पोहरादेवी येथे शक्तीप्रदर्शन केले. यावरून भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. 

याबाबत शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी भाष्य केले आहे. संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे गर्दी जमवून केलेले शक्तीप्रदर्शन अयोग्य होते, असे सांगत याप्रकरणात चौकशी पूर्ण झाल्यावर दोषींवर नक्की कारवाई होईल, असे विनायक राऊत म्हटले आहे. (Shiv Sena MP Vinayak Raut on Sanjay Rathod Poharadevi matter)

गुरुवारी विनायक राऊत यांनी 'TV9 मराठी' वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राजकीय दबावाला बळी पडून कारवाई करणे योग्य ठरणार नाही. पोहारादेवी येथी झालेल्या गर्दीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संजय राठोड यांच्यावर नाराज आहेत की नाही, हे मला माहीत नाही. सर्वांना समान न्याय, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. त्यामुळे पोहरादेवी प्रकरणात कोणीही सुटणार नाही. तसेच, या प्रकरणावरुन राज्यातील महाविकासआघाडीत कोणतीही खदखद नाही. मात्र, जो कोणी चुकला असेल त्याला मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत, असे विनायक राऊत यांनी सांगितले.

याचबरोबर, संजय राठोड प्रकरणात भाजपाने केलेले आरोप चुकीचे आहेत. भाजपाकडे आरोप करण्यापलीकडे दुसरे काहीच उरले नाही. या प्रकरणाची निपक्ष:पातीपणे चौकशी होईल. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसून येत आहे. याशिवाय, या प्रकरणात आरोप करणाऱ्या भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे, असेही विनायक राऊत यांनी सांगितले.

संजय राठोड यांनी काल घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!
संजय राठोड यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. परंतु त्यांना भेटीसाठी दीड तास ताटकळत राहावे लागल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, यानंतर उद्धव ठाकरे यांनी केवळ दोनच मिनिटं संजय राठोड यांच्याशी संवाद साधला. संजय राठोड वर्षा बंगल्यावर गेले त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत एका बैठकीत व्यस्त होते. त्यामुळे संजय राठोड यांना बराच वेळ वाट पाहावी लागली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते, ऊर्जामंत्री नितीन राऊतदेखील वर्षा बंगल्यावर पोहोचले. संजय राठोड आणि त्यांच्यात काही चर्चा झाली का, याबद्दलची माहिती समजू शकलेली नाही.
 

Web Title: "CM will not forgive anyone who made a mistake", Shiv Sena MP Vinayak Raut on Sanjay Rathod Poharadevi matter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.