पालकमंत्री बदलणे म्हणजे पंपावरील माणूस बदलण्याइतके सोपे आहे का..? सतेज पाटील यांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 18:38 IST2020-08-15T18:37:23+5:302020-08-15T18:38:38+5:30
जे माझ्या निष्क्रियतेबद्धल बोलतात ते किती सक्रिय होते हे पावणेतीन लाख मतांनी पराभव करून कोल्हापूरच्या जनतेने दाखवून दिले आहे

पालकमंत्री बदलणे म्हणजे पंपावरील माणूस बदलण्याइतके सोपे आहे का..? सतेज पाटील यांचे प्रत्युत्तर
कोल्हापूर - पालकमंत्री बदलणे म्हणजे पेट्रोल पंपावरील माणूस बद्दलण्याइतके सोपे आहे का अशी विचारणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली. जे माझ्या निष्क्रियतेबद्धल बोलतात ते किती सक्रिय होते हे पावणेतीन लाख मतांनी पराभव करून कोल्हापूरच्या जनतेने दाखवून दिले आहे असा टोलाही त्यांनी भाजप नेते व माजी खासदार धनंजय महाडिक यांना लगावला. युवक काँग्रेसने महाडिक यांच्या दारात शुक्रवारी आंदोलन केल्यानंतर त्यांनी पालकमंत्री पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. कोरोनाचे संकट थोपवण्यात अयशस्वी ठरलेल्या निष्क्रिय पालकमंत्र्यांना बदलून त्याऐवजी कामाची धडाडी असलेल्या हसन मुश्रीफ यांना पालकमंत्री करावे असे त्यांनी म्हटले होते..त्यास पालकमंत्री पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.
सतेज पाटील म्हणाले, युवक काँग्रेसचे आंदोलन राज्यव्यापी होते. ते महाडिक यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या दारातही करण्यात आले पण त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. महाडिक मात्र संतापले कारण आपल्यावर भाजपचा शिक्का बसला तर अन्य पक्षात जाण्याचे दरवाजे बंद होतील अशी भीती त्यांना वाटते.
भाजपने त्यांना साखर कारखाना अभ्यास समितीचे पद दिले आहे पण ज्यांच्या स्वतःच्या कारखान्यावर ३०० कोटींच्या कर्जाचा डोंगर आहे व जो कारखाना तीन हंगाम घेऊ शकलेला नाही अशा कारखान्याचे प्रमुख इतर कारखान्याचे प्रश्न काय मांडणार अशी खिल्ली पालकमंत्री पाटील यांनी उडवली.
महाडिक यांच्याकडून कौतुक
भाजपचे असूनही धनंजय महाडिक यांनी महाविकास आघाडीतील ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कामाचे कौतुक केले याचा आम्हांला आनंद असल्याची प्रतिक्रियाही पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केली..