BJP MP Janardan Singh Sigriwal & Supporters Beaten by Local People in Maharajganj, Bihar | संयम सुटला! भाजपा समर्थकांना संतप्त लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारलं; खासदार थोडक्यात बचावले

संयम सुटला! भाजपा समर्थकांना संतप्त लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारलं; खासदार थोडक्यात बचावले

ठळक मुद्देभाजपा खासदाराला करावा लागला संतप्त पूरग्रस्तांचा सामना पूर आला तेव्हा खासदार आले नाहीत, विधानसभा निवडणूक आल्याने दिसले संतापलेल्या लोकांच्या भावना अनावर, लाथाबुक्क्यांनी समर्थकांना केली मारहाण

नवी दिल्ली - बिहारच्या सिवानमध्ये भारतीय जनता पार्टीच्या खासदाराला पूरग्रस्त पीडितांच्या संतापाचा सामना करावा लागला आहे. खासदार जर्नादन सिंग सिग्रीवाल पूरगस्तांसाठी बनवण्यात आलेल्या शिबिराच्या तक्रारी आल्यानंतर त्याठिकाणी पाहणीसाठी गेले होते. या दौऱ्यावेळी संतप्त लोकांनी खासदार समर्थकांना अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. तर खासदारही थोडक्यात बचावले, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काँग्रेसच्या नेत्या अर्चना दालमिया यांनीही हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. नेटीझन्सही या मारहाणीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल करत आहेत. अर्चना दालमिया यांनी व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की, जनता त्रस्त आहे. हे बिहारमधील पूरग्रस्त लोक आहेत, नितीश कुमारजी निवडणूक आली आहे, कोणत्या कामासाठी तुम्ही मतदान मागणार आहात? याठिकाणी ज्यांना मारहाण होत आहे ते बिहारच्या महारजगंज मतदारसंघाचे भाजपा खासदार जर्नादन सिंह सिग्रीवाल आणि त्यांचे समर्थक आहेत. जे मारत आहेत ते पुरामुळे प्रभावित झालेले लोक आहेत असं त्यांनी सांगितले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार शनिवारी संध्याकाळी खासदार जर्नादन सिंह सिग्रीवाल त्यांच्या समर्थकांसोबत लकडी येथील पडौली पंचायत भवनला पोहचले. तेथे पंचायतीचे मुख्य आणि खासदार समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. या वादाचं रुपांतर मारहाणीत झालं. सगळीकडे गोंधळ निर्माण झाला. दोन्ही बाजूच्या लोकांनी लाथाबुक्क्यांनी आणि खुर्च्या फेकून एकमेकांना मारहाण केली. त्यावेळी खासदार सिग्रीवालही तिथेच होते. काही वेळानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून सगळ्यांना शांत केले.

या घटनेनंतर पंचायतीच्या लोकांनी सांगितले की, जेव्हा पूर आला त्यानंतर खासदार कधीच दिसले नाहीत. आता विधानसभा निवडणूक येत असल्याने ते पुन्हा लोकांमध्ये आले. त्यामुळे लोकांचा संताप अनावर झाला. सोशल मीडियावर खासदाराच्या मारहाणीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. राजकीय नेतेही हा व्हिडीओ शेअर करत भाजपाला टार्गेट करत आहेत.

काँग्रेस नेते सलमान निजामी यांनीही ट्विट करत या, तुमचीच वाट पाहत होतो, भाजपा नेत्याचे स्वागत जनता अशाचप्रकारे करते. यापूर्वीही लोकप्रतिनीधीबद्दल लोकांचा राग अनावर झाल्याचं दिसून आलं होतं. महाराजगंज येथील जेडीयू आमदार हेमनारायण साह यांना लोकांनी घेरलं होतं.   

Web Title: BJP MP Janardan Singh Sigriwal & Supporters Beaten by Local People in Maharajganj, Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.