दिल्लीतील पोटनिवडणुकीत भाजपचा धुव्वा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 05:09 AM2021-03-04T05:09:43+5:302021-03-04T05:10:13+5:30

महापालिकेत ‘आप’ने ४, तर काँग्रेसने जिंकली एक जागा

BJP lost Delhi by-elections | दिल्लीतील पोटनिवडणुकीत भाजपचा धुव्वा

दिल्लीतील पोटनिवडणुकीत भाजपचा धुव्वा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : पेट्रोल, गॅस दरवाढ याचा रोष दिल्लीकरांनी भाजपवर काढल्याचे दिल्ली महापालिकेच्या पाच जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांतून स्पष्ट झाले आहे. भाजपला पाचपैकी एकही जागा जिंकता आली नाही, तर आम आदमी पक्षाने चार व काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला.
   या पाचपैकी चार जागा आधी आम आदमी पक्षाकडे होत्या. तेथील आपचे नगरसेवक विधानसभेवर निवडून गेले, तर भाजपच्या एका नगरसेवकाचे निधन झाले. त्यामुळे या पोटनिवडणुका झाल्या. या पाचही जागा जिंकण्यासाठी भाजपने सारी ताकद लावली होती. पाचही जागा आम्हालाच मिळतील, असा दावा भाजपने केला होता. 


   पण आपने रोहिणी सी, शालिमार बाग, त्रिलोकपुरी, कल्याणपुरी या प्रभागात बाजी मारली आहे. कॉंग्रेसने चौहान बांगडची जागा जिंकली. तेथून काँग्रेस उमेदवाराने १० हजारांहून अधिक मतांनी विजय मिळविला. आजच्या निकालांमुळे आम आदमी पार्टी व काँग्रेस यांच्यात प्रचंड उत्साह दिसला.  दिल्ली महापालिकेत भाजपची सत्ता आहे; परंतु यावेळी मतदारांनी आम आदमी पार्टीला पसंती दर्शवली. दिल्लीच्या सीमांवर तीन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्याचा त्रास दिल्लीकरांना होत आहे. केंद्र सरकार अद्याप कोणताही तोडगा काढत नसल्याने मतदारांत नाराजी होती. दिल्ली मनपाच्या निवडणुका २०२२ मध्ये होणार आहेत. त्यावेळी तिन्ही पालिकांत आम्हालाच बहुमत मिळेल, असा दावा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला.

Web Title: BJP lost Delhi by-elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.