Bihar Assembly Election Result : "शिवसेनेचं डिपॉझिट गुल, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कुठे आहे आपला चमत्कार?"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 12:53 PM2020-11-11T12:53:08+5:302020-11-11T13:10:09+5:30

BJP Kirit Somaiya And Shivsena : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

BJP Kirit Somaiya Slams Shivsena over Bihar Assembly Election Result | Bihar Assembly Election Result : "शिवसेनेचं डिपॉझिट गुल, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कुठे आहे आपला चमत्कार?"

Bihar Assembly Election Result : "शिवसेनेचं डिपॉझिट गुल, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कुठे आहे आपला चमत्कार?"

googlenewsNext

मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपाला 74 तर जेडीयूला अवघ्या 43 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तर शिवसेनेने 22 जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र यातील सर्व 22 जागांवर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान झालं आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. 

"बिहारमध्ये शिवसेनेचं डिपॉझिट गुल. १ टक्का मतं देखील नाहीत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कुठे आहे आपला चमत्कार?" असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे. भाजपाने नेते निलेश राणे यांनी देखील शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच संजय राऊतांवरही टीकास्त्र सोडलं आहे. निलेश राणे यांनी सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होणाऱ्या शिवसेनेला मिळालेल्या मतांच्या यादीचा मजकूर पोस्ट केला आहे. यासोबतच "वारंवार देशात स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन" असं म्हटलं आहे. 

बिहारमध्ये शिवसेनेची परिस्थिती जशी झाली आहे तशीच परिस्थिती महाराष्ट्रात संजय राऊत यांच्यामुळे होईल असंही निलेश राणे यांनी म्हटलं आहे. "संजय राऊत जोपर्यंत शिवसेनेत आहे तोपर्यंत विरोधकांना भीती नाही कारण या निवडणुकीमध्ये शिवसेनेची बिहारमध्ये जी अवस्था केली तशीच शिवसेनेची अवस्था महाराष्ट्रात राऊत करतील ही आम्हाला खात्री आहे" असं ट्विट केलं आहे.

"शिवसेनेची संजय राऊतांमुळे महाराष्ट्रातही अशीच अवस्था होईल", निलेश राणेंचा हल्लाबोल

"राहुल गांधींना राजकारणात बरच शिकावं लागेल. भाजपासमोर राजकरण करताना राजकारणाची उंची किती व कशी असली पाहिजे हे बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक निवडणुकीने दाखवून दिले. राहुल गांधींच्या नेहमीच्या 15 मिनिटांच्या भाषणामध्ये 12 मिनिटं फक्त मोदींची बदनामी ही कोणाला पचत नाही आणि पटतही नाही" असं देखील निलेश राणे यांनी म्हटलं आहे. निलेश राणे यांनी याआधीही अनेकदा शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. 

"बिहारच्या जनतेने विकास हवा असून जंगलराज नकोय हे दाखवून दिलं"

बिहार व अन्य राज्यांत भाजपाने चांगले यश मिळविले. त्यामुळे मोदी व भाजपा यांची लोकप्रियता कायम असल्याचे स्पष्ट होते. बिहारच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रभारी म्हणून काम पाहणारे देवेंद्र फडणवीस यांनी या विजयानंतर बिहारच्या जनतेचे आभार मानले आहेत. "बिहारच्या जनतेने त्यांना विकास हवा असून जंगलराज नको आहे हे दाखवून दिलं. तसेच देशातील 11 राज्यांमधील पोटनिवडणुकींमध्येही भाजपाने मोठे यश मिळवले आहे. बिहारबरोबरच या राज्यांमध्ये जनतेने भाजपाला दिलेला कौल हा मोदींवरील विश्वासाचे प्रतिक आहे" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Web Title: BJP Kirit Somaiya Slams Shivsena over Bihar Assembly Election Result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.