“BJP has a contract to talk to some people; Nilesh Rane is one of the contractors NCP Target | “भाजपात काही लोकांना बडबड करण्याचा ठेका; निलेश राणे त्यातील एक कंत्राटदार”

“भाजपात काही लोकांना बडबड करण्याचा ठेका; निलेश राणे त्यातील एक कंत्राटदार”

ठळक मुद्देभाजपाने लोकांच्या व शेतकऱ्यांच्या जीवाची होळी केली आहे.देशाची अर्थव्यवस्था लयाला नेली आहे. याकडे लक्ष जावू नये म्हणून काही लोकांना बडबड करण्याचा ठेकानिलेश राणेंच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसने दिलं जोरदार प्रत्युत्तर

मुंबई - भाजपने काही लोकांना बडबड करण्याचा ठेका दिला आहे त्यातील एक कंत्राटदार निलेश राणे आहेत. त्यांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादी काडीचीही किंमत देत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी निलेश राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर निलेश राणे यांनी टीका केली होती त्या टिकेला महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाने लोकांच्या व शेतकऱ्यांच्या जीवाची होळी केली आहे. देशाची अर्थव्यवस्था लयाला नेली आहे. याकडे लक्ष जावू नये म्हणून काही लोकांना बडबड करण्याचा ठेका दिला आहे असेही महेश तपासे म्हणाले.

काय म्हणाले होते निलेश राणे?

राज्यात सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी काही आयपीएस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्याचे विधान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 'लोकमत ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं. मात्र या विधानानंतर अनिल देशमुख यांनी त्याबाबत सारवासारव केली होती. त्यानंतर आता भल्या पहाटे शपथ घेतलेल्या फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करता यावे, यासाठी काही अधिकारी राबत होते, असा दावा शिवसेनेने केला. आमदारांचे कच्चे दुवे शोधून पहाटेच्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करत होते, असा दावा सामनात आज प्रसिद्ध झालेल्या सामना अग्रलेखामधून करण्यात आला. मात्र शिवसेनेच्या या दाव्यावर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला होता.

शिवसेना नेहमी पहाटेच्या भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या शपथविधीवर टीका करते. परंतु उपमुख्यमंत्री आणि राष्टवादीचे नेते अजित पवार पहाटे- पहाटे राज्यपालांच्या बंगल्यावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते का? असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला होता तसेच अजित पवार यांच्याकडे त्यावेळी आमदार टिकले नाही म्हणून ते परत गेले, असं निलेश राणे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित पवार यांनीच केला असा दावा देखील निलेश राणे यांनी यावेळी केला होता.

"पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित पवारांनीच"

सामना अग्रलेखात काय म्हटलं होतं?

सामनाच्या अग्रलेखात सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करणारे अधिकारी कोण यापेक्षा काही झाले तरी भाजपाचे सरकार बनले पाहिजे असे मानणारे सहानुभूतीदार कोण ते महत्त्वाचे आहे. पहाटे पहाटे सरकार स्थापन करण्याचा सोहळा पार पडला त्या गुप्त कटात काही अधिकाऱ्यांचा सहभाग असायलाच हवा. हे सर्व नाट्य वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर घडले. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीत राहण्यासाठी काही पोलीस अधिकारी काही लहान पक्षांच्या आणि अपक्ष आमदारांना वेगवेगळ्या पद्धतीने जाळ्यात ओढत होते, असा दावा करण्यात आला आहे. तसेच आमदारांचे कच्चे दुवे शोधून पहाटेच्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करत होते. गुप्तचर खात्यानेही याकामी विशेष कामगिरी बजावली हे सत्यच आहे. बहुमत सिद्ध करून द्यायची जबाबदारी आपल्या शिरावर घेऊनच काही अधिकारी राबत होते. मात्र फडणवीस सरकार कोसळले आणि महाविकास आघाडीचे सरकार यायचे ते आलेच, असं सामनामधून सांगण्यात आले आहे.

नेमकं काय म्हणाले गृहमंत्री अनिल देशमुख?

चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले. त्यात एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, असे सांगणे, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, अशी विधाने करणे, असे प्रकार समोर आले. त्यानंतर स्वत: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी यात हस्तक्षेप केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यात चर्चा झाली आणि हे प्रकरण योग्य पद्धतीने मार्गी लावण्यात आले, असं अनिल देशमुख यांनी सांगितले.

Web Title: “BJP has a contract to talk to some people; Nilesh Rane is one of the contractors NCP Target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.