BJP leader Nilesh Rane has criticized Shiv Sena and NCP | "पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित पवारांनीच"

"पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित पवारांनीच"

मुंबई: राज्यात सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी काही आयपीएस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्याचे विधान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 'लोकमत ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीत केले होते. मात्र या विधानानंतर अनिल देशमुख यांनी त्याबाबत सारवासारव केली होती. त्यानंतर आता भल्या पहाटे शपथ घेतलेल्या फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करता यावे, यासाठी काही अधिकारी राबत होते, असा दावा शिवसेनेने केला आहे. आमदारांचे कच्चे दुवे शोधून पहाटेच्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करत होते, असा दावा सामनात आज प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखामधून करण्यात आला आहे. मात्र शिवसेनेच्या या दाव्यावर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे.

"आता शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली, भाजपाची ही झाशीची राणी इतकी शेफारली"

निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, शिवसेना नेहमी पहाटेच्या भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या शपथविधीवर टीका करते. परंतु उपमुख्यमंत्री आणि राष्टवादीचे नेते अजित पवार पहाटे- पहाटे राज्यपालांच्या बंगल्यावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते का, असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच अजित पवार यांच्याकडे त्यावेळी आमदार टिकले नाही म्हणून ते परत गेले, असं निलेश राणे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित पवार यांनीच केला, असा दावा देखील निलेश राणे यांनी यावेळी केला आहे.

तत्पूर्वी, सामनाच्या अग्रलेखात सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करणारे अधिकारी कोण यापेक्षा काही झाले तरी भाजपाचे सरकार बनले पाहिजे असे मानणारे सहानुभूतीदार कोण ते महत्त्वाचे आहे. पहाटे पहाटे सरकार स्थापन करण्याचा सोहळा पार पडला त्या गुप्त कटात काही अधिकाऱ्यांचा सहभाग असायलाच हवा. हे सर्व नाट्य वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर घडले. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीत राहण्यासाठी काही पोलीस अधिकारी काही लहान पक्षांच्या आणि अपक्ष आमदारांना वेगवेगळ्या पद्धतीने जाळ्यात ओढत होते, असा दावा करण्यात आला आहे. तसेच आमदारांचे कच्चे दुवे शोधून पहाटेच्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करत होते. गुप्तचर खात्यानेही याकामी विशेष कामगिरी बजावली हे सत्यच आहे. बहुमत सिद्ध करून द्यायची जबाबदारी आपल्या शिरावर घेऊनच काही अधिकारी राबत होते. मात्र फडणवीस सरकार कोसळले आणि महाविकास आघाडीचे सरकार यायचे ते आलेच, असं सामनामधून सांगण्यात आले आहे. 

Video: मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन यशस्वी; मनसैनिकांचा 'लोकल'ने प्रवास

सहानुभूतीदार अधिकारी मंडळाच्या भरवशावर कुणी सरकार पाडण्याचे मनसुबे पाहत असतील तर ते वेडगळपणाचे ठरेल. यातील काही अधिकारी आजही उच्चपदावर आहे. ठाकरे सरकार येऊ नये म्हणून उघड प्रयत्न करूनही आपले कोणी काय वाकडे केले, या थाटात त्यांचा वापर असतो. सरकारला धोका असतो तो याच प्रवृत्तीपासून. अशा प्रवृत्तींवर लक्ष ठेवणे हे गृहखात्याचे काम आहे. ते त्यांनी पार पाडले तर सरकारचे भवितव्य उत्तम आहे. सरकार पाडण्याचा प्रयत्न कोणताही अधिकारी करत नाही. के फक्त मनसुबेच ठरतात. पण अस्तनीतील निखारे हे असतातच सावधगिरी बाळगावीच लागेल, असा सल्लाही सामनामधून देण्यात आला आहे.

नेमकं काय म्हणाले गृहमंत्री अनिल देशमुख-

चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले. त्यात एका अतिवरिष्ठ महिला अधिकाºयाचाही समावेश होता. आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, असे सांगणे, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, अशी विधाने करणे, असे प्रकार समोर आले. त्यानंतर स्वत: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी यात हस्तक्षेप केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यात चर्चा झाली आणि हे प्रकरण योग्य पद्धतीने मार्गी लावण्यात आले, असं अनिल देशमुख यांनी सांगितले.

नेमकं काय घडलं होतं त्या पहाटे-

विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेने भाजपासोबत युती तोडली होती. यानंतर शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. मात्र ही चर्चा सुरु असताना काही दिवसांनंतर एका रात्रीत घडामोडी घडवून पहाटे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राज्यात राजकीय भूकंप घडला होता. मात्र देवेंद्र फडणवीस सरकारकडे बहुमत नसल्यामुळे 78 तासांमध्ये कोसळलं आहे. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे फडणवीस सरकार कोसळलं होतं.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: BJP leader Nilesh Rane has criticized Shiv Sena and NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.