Today, MNS leader Sandeep Deshpande traveled by local train | Video: मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन यशस्वी; मनसैनिकांचा 'लोकल'ने प्रवास

Video: मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन यशस्वी; मनसैनिकांचा 'लोकल'ने प्रवास

मुंबई: कोरोना विषाणूच्या फैलावास सुरुवात झाल्यानंतर बंद करण्यात आलेली मुंबईतील उपनगरीय लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी सुरू होऊ शकलेली नाही. लोकलसेवा बंद असल्याने कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेने सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यासाठी सविनय कायदेभंग आंदोलनाची हाक दिली होती. यानंतर आज मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लोकलने प्रवास करून आंदोलन केले.

संदीप देशपांडे म्हणाले की, आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी लोकल सुरु करा. बसमध्ये लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे, अशी अनेकवेळा राज्य सरकारकडे मागणी केली होती. बसमधून प्रवास केल्यास कोरोना पसरत नाही. मात्र रेल्वेने प्रवास केल्यास कोरोना पसरतो असा सरकारचा समज आहे. त्यामुळे आज आम्ही सविनय कायदेभंग आंदोलनाची हाक दिली होती. त्याप्रमाणे आम्ही नाकावर टिच्चून हा रेल्वे प्रवास करत आहोत, असं संदीप देशपांडे यांनी सांगितले.

आंदोलनाबाबत काय म्हणाले होते संदीप देशपांडे

'रेल्वे सेवा सुरू करा अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल' असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला होता. देशपांडे यांनी 17 सप्टेंबर रोजी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केले होते. तसेच 'बसच्या गर्दीत कोरोना होत नाही आणि रेल्वेच्या गर्दीत होतो, असा सरकारचा समज आहे का? असा थेट सवालही सरकारला केला आहे. यासोबतच एक व्हिडीओ देखील शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये बसमधील गर्दी पाहायला मिळत होते.

लोकल सेवा सुरु करण्याची मागणी रास्त, पण- राजेश टोपे

लोकल सेवा सुरु करण्याची मागणी रास्त आहे. पण लोकलमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन शक्य नाही. सध्या हे धोक्याचं ठरु शकतं. लोकल ट्रेन सुरु करण्यासंबंधी अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

मुंबई उपनगरीय लोकलसेवा सुरू करण्यास तयार- मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक

मुंबई उपनगरीय लोकलसेवा सुरू करण्यास रेल्वे तयार आहे. मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी त्याबाबत आधीच आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाकडे मागणी केली व त्यास अनुमती मिळाली तर आम्ही लगेचच लोकलसेवा पूर्ववत करू, असे नमूद करण्यात आले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Today, MNS leader Sandeep Deshpande traveled by local train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.