'त्या' १०० लोकांची यादी द्या, कारवाई होईल; फडणवीसांचा संजय राऊतांना 'शब्द'

By कुणाल गवाणकर | Published: November 24, 2020 12:40 PM2020-11-24T12:40:44+5:302020-11-24T12:44:30+5:30

ED raids Shiv Sena MLA Pratap Sarnaik: शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घर आणि कार्यालयावर ईडीच्या छापेमारीनं राजकारण तापलं

bjp devendra fadnavis assures ed action after shiv sena mp sanjay raut challenges | 'त्या' १०० लोकांची यादी द्या, कारवाई होईल; फडणवीसांचा संजय राऊतांना 'शब्द'

'त्या' १०० लोकांची यादी द्या, कारवाई होईल; फडणवीसांचा संजय राऊतांना 'शब्द'

Next

मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) अधिकारी पोहोचले आहेत. त्यांचे पुत्र पूर्वेश आणि विहंग यांच्या घरीदेखील ईडीचं पथक दाखल झालं आहे. त्यांच्या कार्यालयांमध्येही ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. सध्या प्रताप सरनाईक आणि त्यांचे दोन्ही पुत्र परदेशात आहेत. त्यांनीदेखील या माहितीला दुजोरीला दिला आहे. पण ईडी कोणत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोहोचली आहे, याचा तपशील आपल्याकडे नसल्याचं त्यांनी सांगितलं. 




सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयांवर ईडीने छापे टाकल्यानंतर आता राजकीय वातावरण तापू लागलं आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा महाविकास आघाडीकडून केला जात आहे. यानंतर भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. काही चुकीचं केलं नसेल, तर घाबरण्याचं कारण नाही असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काही पुरावे असतील म्हणून ईडीनं कारवाई केली असेल. काही ठोस पुरावे हाती असल्याशिवाय ईडी कारवाई करत नाही, असंदेखील फडणवीस पुढे म्हणाले.




शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घर, कार्यालयांवर ईडीनं टाकलेल्या छापेमारीवरून शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला. ईडीनं कधी भाजप नेत्यांच्या घरी छापा टाकल्याचं मी ऐकलेलं नाही. मी १०० माणसांची यादी ईडीला देतो. ईडीनं त्यांच्यावर कारवाई करून दाखवावी, असं थेट आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. 'राऊत यांनी १०० लोकांची यादी माझ्याकडे द्याली. त्यांच्यावर कारवाई होईल हा माझा शब्द आहे,' असं फडणवीस म्हणाले.

...म्हणून ईडीच्या कारवाईचं स्वागत; सोमय्यांचा पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंवर बाण

आम्हाला कोणाच्या बापाला घाबरत नाही; संजय राऊत आक्रमक
कितीही प्रयत्न केला तरी हे महाविकास आघाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. तुम्ही सुरुवात केली असेत तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. आमच्या मंत्री, आमदारांच्या घराबाहेर ईडीनं कार्यालयं थाटली, तरीही आम्ही घाबरत नाही. ईडी एखाद्या राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणं काम करतेय, अशी टीका त्यांनी केली.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घरी ईडीचं पथक; सेनेचे इतरही नेते रडारवर?

प्रताप सरनाईकांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. कितीही दबाव आणला तरी महाविकास आाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. सरकारी संस्थांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र सुरुवात तुम्ही केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे. ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. मात्र अशा कारवाया करून पुढची २५ वर्षे भाजपाचे महाराष्ट्रात सरकार येणार नाही. तसेच सरकारी संस्थांनी राजकीय शाखा असल्यासारखे वागू नये, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला.

Web Title: bjp devendra fadnavis assures ed action after shiv sena mp sanjay raut challenges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.