bjp leader kirit somaiya welcomes ed raids at sena mla pratap sarnaiks office and house | ...म्हणून ईडीच्या कारवाईचं स्वागत; सोमय्यांचा पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंवर बाण

...म्हणून ईडीच्या कारवाईचं स्वागत; सोमय्यांचा पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंवर बाण

मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) अधिकारी पोहोचले आहेत. त्यांचे पुत्र पूर्वेश आणि विहंग यांच्या घरीदेखील ईडीचं पथक दाखल झालं आहे. त्यांच्या कार्यालयांमध्येही ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. सध्या प्रताप सरनाईक परदेशात आहेत. त्यांनीदेखील या माहितीला दुजोरीला दिला आहे. पण ईडी कोणत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोहोचली आहे, याचा तपशील आपल्याकडे नसल्याचं त्यांनी सांगितलं. 
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयात सुरू असलेल्या छापेमारीचं स्वागत सुरू आहे. 'शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कंपन्यांच्या कार्यालयांवर धाडी टाकल्या जात आहेत. बेनामी, बोगस आणि भ्रष्टाचाराचा पैसा असेल तर कारवाई व्हायला हवी. शिवसेनेचे नेते आणि त्यांचे मुखियादेखील अशाच प्रकारचे उद्योग करतात हे सगळ्यांना माहीत आहे,' असं सोमय्या म्हणाले. 
आज सकाळी आठ-साठे आठच्या सुमारास ईडीची तीन पथकं तपासासाठी पोहोचली. त्यांनी आमदार प्रताप सरनाईक, त्यांचे दोन पुत्र आणि त्यांच्या कार्यालयात तपास सुरू केला. ईडी नेमक्या कोणत्या प्रकरणात तपास करत आहे, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. सध्या सरनाईक पिता पुत्र देशाबाहेर असल्याचं समजतं. सरनाईक यांच्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना ईडीनं बोलावलं आहे. शिवसेनेच्या इतर काही नेत्यांनादेखील ईडीकडून नोटिसा बजावण्यात आल्या असल्याचं समजतं.


प्रताप सरनाईक यांच्या घरी, कार्यालयात ईडीचे अधिकारी पोहोचल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. 'मनी लॉण्ड्रिंगसारख्या प्रकरणात शिवसेना पटाईत आहेत. त्यांचे मुखिया यामध्ये अग्रेसर आहेत. त्यामुळे मला याबद्दल कोणतंही आश्चर्य वाटत नाही. मुंबई महापालिकेत माफिया राज असल्याचा आरोप मी आधीही केला आहे. पालिकेतून कंत्राट, भागिदारीतून प्रचंड पैसा येत असतो,' याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

या प्रकरणी अद्याप शिवसेनेकडून कोणत्याही नेत्यानं प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र शिवसेना नेते थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार असल्याचं समजतं. मात्र ही कारवाई राजकीय स्वरूपची असून ती सूडबुद्धीनं सुरू असल्याचा सूर पक्षात आहे. अर्णब गोस्वामी, कंगना राणौत प्रकरणात सरनाईक यांनी अतिशय आक्रमकपणे पक्षाची बाजू लावून धरली होती. त्यामुळेच त्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याची चर्चा शिवसेनेत आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bjp leader kirit somaiya welcomes ed raids at sena mla pratap sarnaiks office and house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.