Bihar Election 2020: I am Modi's Hanuman; BJP and Lok Janshakti clashed in Bihar | Bihar Election 2020: मी मोदींचा हनुमान; भाजप आणि लोक जनशक्ती यांच्यात बिहारमध्ये जुंपली 

Bihar Election 2020: मी मोदींचा हनुमान; भाजप आणि लोक जनशक्ती यांच्यात बिहारमध्ये जुंपली 

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी असलेल्या संबंधांचा वारंवार उल्लेख करून संभ्रम निर्माण करीत आहेत, असा थेट हल्ला भाजपने शुक्रवारी केला. पक्षाने म्हटले की, लोक जनशक्ती पक्षाशी भाजपची कोणतीही मैत्री नाही.

चिराग पासवान हे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रशंसा करताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका करतात. यामुळे लोजप आणि भाजप यांच्यात काही मैत्री असावी, अशा चर्चा सुरू आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, ‘लोक जनशक्ती पक्षाशी आमचे कोणतेही संबंध नाहीत, हे आम्हाला स्पष्ट करायचे आहे आणि असे संभ्रम निर्माण करणारे राजकारणही आम्हाला आवडणार नाही.’

बिहारमध्ये मोदींच्या १२ सभा होणार
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये १२ सभा घेणार आहेत. पहिली रॅली २३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. बिहारचे निवडणूक प्रभारी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.

पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या सर्व सभा या रालोआच्या सभा असतील. यात मुख्यमंत्री नितीशकुमार आणि रालोआच्या घटक पक्षांचे नेते उपस्थित असतील. मोदी हे बिहारमध्ये १२ सभा घेतील. २३ आॅक्टोबर रोजी सासाराममध्ये पहिली सभा, दुसरी सभा गयामध्ये, तर तिसरी भागलपूरमध्ये होईल. फडणवीस म्हणाले की, २८ आॅक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी यांची दरभंगामध्ये रॅली होईल. त्यानंतर मुजफ्फरपूरमध्ये आणि तिसरी रॅली पाटण्यात होईल. १ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी पुन्हा राज्यात येतील.

मी मोदींचा हनुमान -पासवान
पाटणा : मी पंतप्रधान मोदी यांचा ‘हनुमान’ असून, मोदी माझ्या हृदयात असतात. जर माझ्या टीकाकारांना हवे असेल, तर ते माझे हृदय उघडून पाहू शकतात. मोदी यांचे छायाचित्र वापरण्याची मला गरज नाही, असे चिराग पासवान यांनी शुक्रवारी म्हटले.

Web Title: Bihar Election 2020: I am Modi's Hanuman; BJP and Lok Janshakti clashed in Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.