नितीन गडकरी, फडणवीसांना धक्का; नागपुरात काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 14:51 IST2020-12-04T14:50:58+5:302020-12-04T14:51:58+5:30
Nagpur Vidhan Parishad graduate constituency Result : नागपूर हा भाजपाचा गड आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, काँग्रेसने या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली आहे.

नितीन गडकरी, फडणवीसांना धक्का; नागपुरात काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच पर्यायाने भाजपाचे प्राबल्य असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांना ६१७०१ मते मिळाली आहेत. तर विरोधी भाजपाचे उमेदवार संदीप जोशी यांना ४२९९१ मते मिळाली आहेत. संदीप जोशी यांचा १८७१० मतांनी पराभव झाला आहे.
Maharashtra: Congress candidate Abhijit Wanjarri wins Nagpur division graduate constituency in elections to state legislative council. pic.twitter.com/Cah5kQEyVK
— ANI (@ANI) December 4, 2020
नागपूर हा भाजपाचा गड आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, काँग्रेसने या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे. वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपाचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर होते. हीच आघाडी कायम राहिली आणि भाजपाच्या जोशी यांना मोठ्या मतफरकाने पराभव पत्करावा लागला. कोरोनामुळे फारशी अपेक्षा नसतानादेखील मतदारसंघातील सहाही जिल्ह्यात ६४ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. विशेष म्हणजे ग्रामीण भागातूनदेखील जोरदार प्रतिसाद मिळाला. गुरुवारी दुपारी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली.
पुण्यामध्येही यंदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी लढत पुणे पदवीधर मतदार संघात पहायला मिळाली. नेहमी भाजपाला साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यंदा राष्ट्रवादीच्या पारड्यात मते टाकून भाजपाच्या गडाला मोठे खिंडार पाडले आहे. पुणे पदवीधर मतदार संघात पहिल्याच पसंती क्रमांकाची तब्बल 1 लाख 22 हजार 145 मते घेऊन , महा विकास आघाडीचे अरुण गणपती लाड विजयी झाले आहेत. त्यांनी 48 हजार 824 मतांनी बीजेपीचे संग्राम देशमुख यांचा पराभव केला आहे. देशमुख यांना 73 हजार 321 मते मिळाली.
अमरावतीत भाजपावर नामुष्की
अमरावतीमध्ये दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरु आहे. यामध्ये भाजपाचा उमेदवार सहाव्या क्रमांकावर फेकला गेल्याने बाद ठरविण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी काही वेळापूर्वीच शिवसेनेला डिवचताना ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही, आमचा एक तरी आला, असा टोला हाणला होता. तो याच अमरावतीच्या जागेवरून होता. मात्र, आता भाजपाचा उमेदवारच शर्यतीतून बाद झाल्याने खळबळ उडाली आहे.