केंद्रातील असंवेदनशील व जुलमी भाजपा सरकारविरोधातील संघर्ष तीव्र करणार - बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 05:12 PM2021-01-14T17:12:42+5:302021-01-14T17:13:34+5:30

Balasaheb Thorat : इंधन दरवाढीतून मोदी सरकारने आतापर्यंत १९ लाख कोटी रुपयांची नफेखोरी केली आहे. याचा परिणाम सर्वसामान्य लोक व शेतकरी यांच्यावरच होत आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

Balasaheb Thorat will intensify the struggle against the insensitive and tyrannical BJP government at the Center | केंद्रातील असंवेदनशील व जुलमी भाजपा सरकारविरोधातील संघर्ष तीव्र करणार - बाळासाहेब थोरात

केंद्रातील असंवेदनशील व जुलमी भाजपा सरकारविरोधातील संघर्ष तीव्र करणार - बाळासाहेब थोरात

Next
ठळक मुद्दे'शेतकऱ्यांबरोबर मोदी सरकारने सामान्य जनतेला लुटण्याचा उद्योग सुरु केला आहे.'

मुंबई : केंद्रातील भाजपा सरकारने लादलेल्या तीन काळ्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी संघर्ष करत आहेत. हे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर जवळपास मागील ४५ दिवसांपासून लाखो शेतकरी हाडं गोठवणाऱ्या थंडीत ठाण मांडून बसलेत. या आंदोलनात आतापर्यंत ६० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला असून केंद्रातील असंवेदनशील सरकारला अजून जाग आलेली नाही. या निर्दयी, अहंकारी मोदी सरकारला जागे करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते १६ जानेवारीला नागपूर येथील ‘राजभवनला घेराव’ घालणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

केंद्रातील मोदी सरकार निवडक उद्योगपतींच्या हितासाठी काम करत असून या सरकारला देशातील गोरगरीब जनता शेतकरी, कामगार यांचे काही देणे घेणे नाही. केंद्र सरकारने संसदेच्या नियमांना पायदळी तुडवून आणलेले तीन काळे कृषी कायदे हे शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारे आहेत. भांडवलदारांच्या हिताचे हे कायदे तात्काळ रद्द करावेत ही शेतकऱ्यांची भूमिका योग्य असून काँग्रेस पक्षाने वारंवार शेतकऱ्यांना पाठिंबा देत विविध आंदोलनाच्या माध्यमातून निर्दयी केंद्र सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

केंद्र सरकारचे हे काळे कृषी कायदे महाराष्ट्रात लागू केले जाणार नाहीत ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. एकीकडे शेतकरी, कामगार उद्ध्वस्त होत असताना दुसरीकडे इंधन दरवाढ करून सामान्य जनतेलाही लूट सुरु आहे. कृषी कायदे रद्द करावेत आणि पेट्रोल- डिझेलची दरवाढ त्वरीत मागे घ्यावी या मागणीसाठी १६ जानेवारी रोजी नागपूर येथे आंदोलन केले जाणार आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.       

शेतकऱ्यांबरोबर मोदी सरकारने सामान्य जनतेला लुटण्याचा उद्योग सुरु केला आहे. पेट्रोल डिझेलमध्ये सतत दरवाढ करु नफेखोरी केली जात आहे. इंधन दरवाढीने ७३ वर्षातील उच्चांक गाठला आहे. मे २०१४ मध्ये पेट्रोलवर असलेली ९.२० रुपये एक्साईज ड्युटी वाढवून मागील सहा वर्षात मोदी सरकारने ३२.९८ रुपये केली आहे, लिटरमागे २३.७८ रुपयांची वाढ म्हणजे तब्बल २५८ टक्के वाढ तर डिझेलची मे २०१४ मध्ये असलेली ३.४६ रुपये एक्साईज ड्युटी आज ३१.८३ रुपये केली म्हणजे प्रति लिटर २८.३७ रुपये आणि ८२० टक्क्यांची वाढ. विशेष म्हणजे जगात क्रूड ऑईलचे दर ११० डॉलर प्रति बॅरलवरून ५० डॉलर प्रति बॅरल एवढे घसरलेले असताना ही इंधन दरवाढ केली जात आहे. इंधन दरवाढीतून मोदी सरकारने आतापर्यंत १९ लाख कोटी रुपयांची नफेखोरी केली आहे. याचा परिणाम सर्वसामान्य लोक व शेतकरी यांच्यावरच होत आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

याचबरोबर, शेतकरी व सामान्य जनतेच्या प्रश्नी काँग्रेस पक्ष नेहमीच उभा राहिला असून १६ जानेवारीला ‘किसान अधिकार दिवस’ पाळत आंदोलन केले जात आहे. भाजपाच्या मनमानी कारभाराला देशातील जनता कंटाळली आहे. लोकशाही मूल्ये व संविधानाला पायदळी तुडवत लहरी कारभार सुरु आहे. काँग्रेस पक्ष या जुलमी सरकारविरोधात याआधीही रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे. हे काळे कायदे केंद्र सरकार रद्द करत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहू, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

Web Title: Balasaheb Thorat will intensify the struggle against the insensitive and tyrannical BJP government at the Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.