Balasaheb Thorat remains the congress state president Demand by Yashomati Thakur | “बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष राहिले तर महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही”

“बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष राहिले तर महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही”

ठळक मुद्देबाळासाहेब थोरात हेच प्रदेशाध्यक्ष राहिले पाहिजे, तरच पुढील वेळी राज्यात काँग्रेसचं सरकार येऊ शकेलमागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या १२-१३ जागा येतील असं म्हटलं जात होतंअडचणीच्या काळात बाळासाहेब थोरात यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळत ४४ जागांचे यश खेचून आणलं

मुंबई- काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून पक्षात दोन गट पडल्याचं दिसून येत आहे. एकीकडे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली, त्यात प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी थोरातांनी दर्शवली, सुरूवातीला पक्ष नेतृत्वाने बाळासाहेब थोरातांची मागणी फेटाळली, त्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये पक्ष संघटनेत बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. बाळासाहेब थोरात यांच्याजागी दुसऱ्या प्रदेशाध्यक्षाची नेमणूक करण्याची चर्चा आहे.

यात सर्वाधिक आघाडीचं नाव आहे ते म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विदर्भाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मिळावे अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. तर या पदासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पटोले इच्छुक आहेत, प्रदेशाध्यक्षपदासाठी पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाची खुर्चीही सोडण्याची तयारी दाखवली आहे. दिल्लीतील नेतृत्वानेही नाना पटोले यांच्यावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती राजकीय वर्तुळात आहे, परंतु अद्याप याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही.

यातच आता काँग्रेसच्या महिल्या नेत्यांनी बाळासाहेब थोरात यांचीच प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड करावी अशी मागणी केली आहे. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, बाळासाहेब थोरात हेच प्रदेशाध्यक्ष राहिले पाहिजे, तरच पुढील वेळी राज्यात काँग्रेसचं सरकार येऊ शकेल, ठाकूर यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवांकडे आपलं मत व्यक्त केले आहे. काँग्रेसचे सहप्रभारी आशिष दुवा आणि बी एम संदीप यांच्यासमोर हे विधान केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

त्याचसोबत मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या १२-१३ जागा येतील असं म्हटलं जात होतं, त्यावेळी कोणीही प्रदेशाध्यक्ष बनण्यास तयार नव्हतं, अडचणीच्या काळात बाळासाहेब थोरात यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळत ४४ जागांचे यश खेचून आणलं, त्यामुळे बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष राहिले तर पुढीलवेळी काँग्रेसचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

नाना पटोलेंची स्वबळाची भाषा

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोलेंची निवड निश्चित झाल्याचं समजलं आहे, त्याच पार्श्वभूमीवर नाना पटोलेंनी काँग्रेसच्या स्वबळाचं विधान केले आहे. राज्यात स्वबळावर काँग्रेस पक्ष सत्तेत येईल, यासाठी प्रयत्न करणार आहोत असं त्यांनी सांगितले, नाना पटोले म्हणाले की, आमच्या पक्षामध्ये संघटनात्मक निर्णय घेण्याचे अधिकार आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आहे. जी जबाबदारी मला मिळेल ती प्रमाणिकपणे पार पाडण्याची तयारी माझी असून पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करत राहणार आहे. स्वबळावर महाराष्ट्रात पक्ष सत्तेत कसा येईल आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्राला पुन्हा वैभव प्राप्त करुन देण्याचं काम काँग्रेस पक्षाकडून केलं जाईल" असं त्यांनी सांगितले.

नाना पटोलेंचं नाव हायकमांडकडून निश्चित?

राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी राजीव सातव, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांची नावं आघाडीवर आहेत. पण यातून नाना पटोले यांचं नाव निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे. पण नाना पटोले विधानसभा अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या निवडीमुळे विधानसभा अध्यक्ष बदलाचा प्रश्न आहे. त्याबाबत काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबतची चर्चा केल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, नाना पटोले यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याने आता महाराष्ट्रात विधानसभेचा नवा अध्यक्ष देखील बदलावा लागणार आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून कोणाची निवड होणार याचीही चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: Balasaheb Thorat remains the congress state president Demand by Yashomati Thakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.