परमबीर सिंगांनी नमूद केलेल्या तारखेला अनिल देशमुख कोरोनामुळे क्वारंटाईन होते, पवारांनी आरोपांची हवाच काढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 13:31 IST2021-03-22T13:30:51+5:302021-03-22T13:31:26+5:30
Sharad Pawar On Parambir Singh Letter Bomb: अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या टार्गेटच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मोठा खुलासा केला आहे.

परमबीर सिंगांनी नमूद केलेल्या तारखेला अनिल देशमुख कोरोनामुळे क्वारंटाईन होते, पवारांनी आरोपांची हवाच काढली
Sharad Pawar On Parambir Singh Letter Bomb: मुंबईच माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या टार्गेटच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मोठा खुलासा केला आहे. "परमबीर सिंग यांनी पत्रात नमूद केल्यानुसार फेब्रुवारीच्या मध्यात अनिल देशमुख कोरोनामुळे क्वारंटाइन होते. त्यामुळे त्यांना कुणी भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही", असं म्हणत शरद पवार यांनी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची हवाच काढून टाकली आहे.
शरद पवार यांनी यावेळी अनिल देशमुख कोरोनामुळे रुग्णालयात दाखल असल्याचे आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते क्वारंटाइन असल्याची कागदपत्रंच पत्रकार परिषदेत सादर केली. "अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात ५ ते १५ तारखेपर्यंत कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होते. १५ फेब्रुवारी रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर ते १५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान ते क्वारंटाईन होते. त्यामुळे परमबीर सिंग यांनी केलेले आरोप आणि वस्तुस्थिती यात खूप फरक आहे. अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात कुणाला भेटण्याची शक्यताच नव्हती हे सिद्ध झालंय", असं शरद पवार म्हणाले.
वाझे-देशमुख भेटीची चर्चाच खोटी
अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात कोरोनामुळे रुग्णालयात होते. त्यानंतर ते क्वारंटाइन होते. त्यामुळे या काळात सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची शक्यताच नाही. त्यामुळे परमबीर सिंग यांचे आरोप खोटे असल्याचं दिसून येत आहे, असं शरद पवार म्हणाले.
एटीएस अतिशय योग्य तपास करतंय
"मनसुख हिरेन प्रकरणाचा एटीएस अतिशय योग्य दिशेनं तपास करत आहे. या प्रकरणात शेवटचे धागेदोरे एटीएसच्या हाती लागले आहेत आणि निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत. त्याचवेळी तपासावरुन लक्ष विचलीत करण्यासाठी परमबीर सिंग यांनी पत्र लिहून खोटे आरोप केले आहेत", असा दावा शरद पवार यांनी केला आहे.
"परमबीर सिंग यांना वसुलीचं टार्गेट दिलं होतं मग ते महिनाभर गप्प का बसले होते? त्यांची बदली झाल्यावरच ते का बोलले?", असे सवालही यावेळी पवार यांनी उपस्थित केले आहेत.