'अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप पण अटक नाही', भाजपा नेत्याची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 17:12 IST2021-08-24T17:11:36+5:302021-08-24T17:12:25+5:30
Narayan Rane news: 20 वर्षात पहिल्यांदाच एखाद्या केंद्रीय मंत्र्याला अटक झाली आहे.

'अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप पण अटक नाही', भाजपा नेत्याची टीका
मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्याविरोधातील केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. राणे यांनी जुलै महिन्यातच नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता. दरम्यान, एखाद्या केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याची ही 20 वर्षातील पहिलीच वेळ आहे.
महाराष्ट्रातील 27 मंत्र्यांवर गुन्हे
केंद्रीय मंत्री राणे यांच्या अटकेवर भाजपा प्रवक्ते संबित पात्रा(Sambit Patra) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'नारायण राणे यांच्या अटकेची बाब गंभीर आहे. नारायण राणेंनी काही शब्द वापरले असतील, ते टाळता आले असते. पण, महाराष्ट्रात 42 पैकी 27 असे मंत्री आहेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप आहे. पण, त्यांना अटक नाही. महाराष्ट्रात आज लोकशाहीला काळिमा फासणारी घटना घडली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
कोर्टाचा सुनावणी घेण्यास नकार
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांवरील वादग्रस्त विधानाचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले असून मंगळवारी शिवसेना कार्यकर्त्यांच्या वतीने राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. दरम्यान, नारायण राणे यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली होती, परंतु कोर्टानं याचिकेवर त्वरित सुनावणी घेण्यास नकार दिला.