After the Bihar result, there was a resurgence of leadership in the Congress | बिहार निकालानंतर काँग्रेसमध्ये नेतृत्वावरून पुन्हा ठिणगी

बिहार निकालानंतर काँग्रेसमध्ये नेतृत्वावरून पुन्हा ठिणगी

 शीलेश शर्मा
    लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अत्यंत ढिसाळ कामगिरीनंतर पक्ष नेतृत्वाच्या मुद्यावर पुन्हा ठिणगी पडली आहे. काही दिवसापूर्वी पक्षनेत्या सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे नेते यानिमित्ताने पुन्हा सक्रिय झाले आहेत. टीका करणाऱ्या २३ नेत्यांचा आवाज दाबण्यात आला होता. परंतु आता बिहार आणि देशाच्या इतर भागातील पोटनिवडणुकांच्या निकालानंतर या नेत्यांनी नव्याने आपला आवाज बुलंद करण्यास सुरुवात केली आहे. पक्ष खासदार कपिल सिब्बल आणि कार्ती चिदंबरम यांनी कुणाचाही नामोल्लेख न करता पक्ष नेतृत्वावर हल्लाबोल केला आहे.
पक्षाने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचा इशारा कार्ती चिदंबरम यांनी दिला आहे. कपिल सिब्बल यांनी निवडणूक निकालावर दिलेल्या प्रतिक्रियेवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
सिब्बल यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधी आणि त्यांच्या टीमवर शाब्दिक हल्ला चढवीत मत मांडण्यास कुठलेही व्यासपीठ नसल्याने नाईलाजास्तव आपल्याला जाहीर प्रतिक्रिया व्यक्त करावी लागत असल्याची खंत व्यक्त केली आहे. आज पक्षाला अनुभवी, राजकीय परिस्थितीची जाण असणाऱ्या आणि संघटन बळकट करण्याची क्षमता असलेल्या नेत्यांना पुढे आणण्याची गरज आहे. आता आत्मचिंतनाची वेळ निघून गेली आहे. पक्षाला सशक्त नेतृत्व आवश्यक आहे. पक्ष कमकुवत झाला असल्याचे निवडणूक निकालानंतर सिद्ध झाले आहे. हे स्वीकारावे लागेल, असा घणाघात त्यांनी केला आहे. 
राष्ट्रीय जनता दलाचे वरिष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी महाआघाडीच्या पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडत राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यावर थेट हल्ला चढवला. 
अर्थात राजदचे खासदार मनोज झा यांनी परिस्थिती सांभाळत हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे, काँग्रेसचे नाही, असा खुलासा केला. परंतु निकालानंतर काँग्रेसच्या त्रुटी उघड झाल्या असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस  तारिक अन्वर यांनीही  मान्य  केले  आहे. 


काँग्रेससाठी पराभव ही सामान्य घटना 
काँग्रेससाठी आता पराभव सर्वसामान्य घटनेसारखा झाला आहे. बिहार निवडणुका आणि इतर राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतरही काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल अद्याप कोणताही विचार झालेला नाही. कदाचित त्यांना असे वाटत असेल की, सगळं काही ठीक आहे आणि ही सामान्य घटना आहे, असेही सिब्बल म्हणाले.


जनतेपर्यंत पोहोचण्याची गरज
पक्षाच्या सुधारणेसंदर्भातील उपायांबद्दल सिब्बल म्हणाले, सर्वप्रथम आपल्याला संवादाची प्रक्रिया सुरू करावी लागेल. आम्हाला युतीची गरज आहे आणि जनतेपर्यंत पोहोचण्याचीही गरज आहे. जनता आमच्याकडे येईल याची आम्ही अपेक्षा करू शकत नाही. आमच्याकडे आता पूर्वीसारखी ताकद नाही. ज्यांना राजकीय अनुभव आहे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे; परंतु या सुधारणेसाठी पहिल्यांदा विचारमंथन आवश्यक आहे.


बंडखोरीचा राग    आळवणारे सक्रिय
एकूणच बंडखोरीचा राग आळवणारे काँग्रेस नेते पुन्हा डोके वर काढू लागले आहेत. काश्मीरमध्ये गुलाम नबी आझाद यांना बाजूला सारण्यासाठी पंचायत निवडणुकात त्यांच्या समर्थकांना नेतृत्वाच्या इशाऱ्यावरुन तिकीट नाकारण्यात येत आहे. फारुख अब्दुल्ला-मेहबुबा यांच्या आघाडीसोबत निवडणूक समझोता करू नये. कारण यामुळे जम्मूत काँग्रेसचे नुकसान होईल, असे आझाद यांचे मत होते. परंतु काँग्रेस नेतृत्वाने समझोता करण्याचा निर्णय घेऊन तुमच्या मताची पक्षाला गरज नसल्याचे संकेतच त्यांना दिले.

Web Title: After the Bihar result, there was a resurgence of leadership in the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.