लघुशंकेसाठी थांबलेल्या वाहनचालकाला लुटले ; चिंचवड येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 13:33 IST2020-03-15T13:31:29+5:302020-03-15T13:33:36+5:30
लघुशंकेसाठी थांबलेल्या तरुणाला काेयत्याचा धाक दाखवून लुटल्याची घटना चिंचवड येथे घडली आहे.

लघुशंकेसाठी थांबलेल्या वाहनचालकाला लुटले ; चिंचवड येथील घटना
पिंपरी : लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला गाडी थांबविणाऱ्या तरुणाच्या गळ्याला कोयता लावला. त्यानंतर त्याच्याकडील १० ग्रॅमची सोनसाखळी व १ हजार ६०० रुपये रोख जबरदस्तीने हिसकावून घेतले. चिंचवड येथे शुक्रवारी (दि. १३) रात्री साडेअकराच्या सुमारास जबरी चोरीचा हा प्रकार घडला.
संजय गुलाबराव राऊत (वय २९, रा. त्रिवेणीनगर, निगडी) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राऊत हे शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटलजवळून जात होते. त्यावेळी लघुशंकेसाठी त्यांनी सातव लॅबजवळ रस्त्याच्या कडेला त्यांची गाडी थांबविली. त्यावेळी दोन दुचाकीवरून आलेल्या चार आरोपींनी फिर्यादी राऊत यांना पकडले. त्यांच्या गळ्याला कोयता लावून मोकळ्या जागेत घेऊन गेले. तेथे त्यांच्याकडून १० ग्रॅमची सोनसाखळी व १ हजार ६०० रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून काढून घेतली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.