तुम्हाला माहितीये; हवेतूनच खेचला जातो ऑक्सिजन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 05:55 IST2021-04-22T05:55:21+5:302021-04-22T05:55:52+5:30
निष्णात तज्ज्ञांची आवश्यकता

तुम्हाला माहितीये; हवेतूनच खेचला जातो ऑक्सिजन!
विशाल शिर्के
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी (पुणे) : कोरोनाबाधित रुग्णसंख्येमुळे आपल्याला वैद्यकीय कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिजनचे महत्त्व लक्षात आले आहे. वातावरणातील हवा खेचून त्यातून ऑक्सिजन वेगळा काढून तो वैद्यकीय कारणासाठी वापरला जातो. रॉकेट सायन्ससारखीच अत्यंत गुंतागुंतीची जोखमीची प्रक्रिया त्यासाठी वापरली जाते.
वातावरणात असलेल्या
वायूंचे प्रमाण
आपल्या वातावरणात धूलिकण, बाष्प यांसह विविध प्रकारचे वायू असतात. नायट्रोजन (७८ टक्के), ऑक्सिजन (२०.९४ टक्के), ऑरगॉन (०.९३ टक्के), कार्बनडाय ऑक्साईड हे वातावरणातील प्रमुख वायू असून, ते वातावरणाच्या खालच्या थरात आढळतात. त्यानंतर निऑन, हेलियम, हायड्रोजन, मिथेन, ओझोन असे काही वायू वातावरणाच्या वरच्या थरात असतात. उंच ठिकाणी ऑक्सिजन विरळ असल्याने गिर्यारोहकांना ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जावा लागतो.
कसा बनवितात
वैद्यकीय ऑक्सिजन
गॅस ऑक्सिजन आणि लिक्विड मेडिकल ऑक्सिजन तयार केला जातो. वैद्यकीय कारणासाठी द्रव स्वरूपात ऑक्सिजन साठविला जातो. यंत्राद्वारे वातावरणातील हवा खेचली जाते. त्यानंतर हवा तीनदा शुद्ध केली जाते. धूलिकण आणि इतर अशुद्ध
भाग काढला जातो. कार्बनडाय ऑक्साईड वायू वातावरणात पुन्हा सोडला जातो. केवळ नायट्रोजन, ऑक्सिजन आणो ऑरगॉन हे तीन वायू साठविले जातात. उद्योगांमध्ये या तिन्ही वायूंची आवश्यकता असते. ऑक्सिजन द्रव स्वरूपात आणण्यासाठी उणे १८० डिग्री तापमान संतुलित घेवावे लागते. यासाठी उच्चदाब प्रक्रिया अवलंबली जाते. असा ऑक्सिजन इस्पितळात सिलिंडरद्वारे अथवा मोठ्या टँकद्वारे पुरविला जातो. गॅस सुरू केल्यानंतर द्रव ऑक्सिजन वायू स्वरूपात बाहेर येतो.
काय आहे आव्हान
nएखाद्या प्रकल्पाची क्षमता शंभर टन असेल तर त्याची साठवणूक क्षमता तीनशे टन असते. तिन्ही वायूचा दाब नियंत्रित करावा लागतो.
nहा दाब नियंत्रित करणे आवश्यक असते अन्यथा टाकी फुटून प्रकल्पालाही धोका पोचू शकतो.
nकारखान्यातील टँकमधून गाडीत ऑक्सिजन भरणे आणि गाडीतून तो खाली करणे हे काम जिकिरीचे असते. त्यासाठी चालकही प्रशिक्षित असावा लागतो. प्रकल्प हाताळण्यासाठी तांत्रिक विशेषज्ञ आवश्यक असतो.