हिंजवडीसह सात गावांचा महापालिकेत समावेश होणार का ?

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: July 2, 2025 10:24 IST2025-07-02T10:22:03+5:302025-07-02T10:24:55+5:30

- मागण्या, विरोध आणि पर्यायी प्रस्तावांमुळे वाढतोय वाद : वाढत्या शहरीकरणामुळे नागरी सुविधांवर ताण; स्थानिक पातळीवर जनमत चाचण्या; शासनाच्या निर्णयाकडे लक्ष

Will seven villages including Hinjewadi be included in the Municipal Corporation? | हिंजवडीसह सात गावांचा महापालिकेत समावेश होणार का ?

हिंजवडीसह सात गावांचा महापालिकेत समावेश होणार का ?

पिंपरी : महापालिका क्षेत्रालगतच्या हिंजवडीसह सात गावांचा समावेश महापालिकेत करावा, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. या भागात झपाट्याने शहरीकरण होत असल्याने नागरी सुविधांची गरज वाढली आहे. त्यामुळे समावेशाच्या बाजूने अनेकांचे मत झुकत असले तरी स्थानिक पातळीवर याला तीव्र विरोधही होत आहे. काही लोकांनी तर यासाठी स्वतंत्र महापालिका स्थापण्याची मागणी केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी या भागाच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण नेमा, अशी मागणी केली. याउलट खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे व शंकर जगताप यांनी ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील आहे त्या गावांमधील मूलभूत सुविधा नीटनेटक्या द्या, त्यानंतर या सात गावांचा समावेश करा, असाही सूर शहरातील नागरिकांचा आहे; परंतु राज्य सरकारकडून याबाबत अद्याप कोणताही निर्णय अथवा भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. याबाबत काही ग्रामपंचायतींनी स्थानिक पातळीवर जनमत चाचण्या घेतल्या असून, त्यामध्ये सुमारे ५५-६० टक्के नागरिक समावेशास पाठिंबा देत आहेत. ३०-३५ टक्के नागरिकांनी समावेशाला विरोध दर्शवला आहे, तर उर्वरित १० टक्के लोक स्वतंत्र महापालिकेच्या बाजूने आहेत.

समावेश कशासाठी?

या गावांमध्ये आयटी पार्क, निवासी वसाहती, वाणिज्यिक संकुले यांचा झपाट्याने विकास झाला आहे; मात्र ग्रामपंचायतींकडून पुरेशा नागरी सुविधा मिळत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश झाल्यास पाणीपुरवठा, रस्ते, कचरा व्यवस्थापन, आरोग्यसेवा, शिक्षण सुविधा या सर्वांमध्ये सुधारणा होईल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. ही गावे पुणे व पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमेवर आहेत. त्यामुळे यांचा समावेश हा प्रशासकीयदृष्ट्या सुलभ व सोयीचा ठरेल.

विरोध कशासाठी?

ग्रामपंचायतीमुळे नागरिकांचे प्रशासनाशी थेट नाते राहते. महापालिकेचा कारभार केंद्रित व गुंतागुंतीचा असतो, त्यामुळे स्थानिक प्रश्न दुर्लक्षित राहतील. महापालिकेत गेल्यास मालमत्ता कर, पाणीपट्टी व इतर शासकीय करांमध्ये लक्षणीय वाढ होईल. हे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही, असा युक्तिवाद विरोधक करत आहेत. गावपातळीवरील सामाजिक-सांस्कृतिक रचना व ओळख शहरीकरणात हरवण्याची चिंता स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

स्वतंत्र महापालिकेची मागणी

दरम्यान, तिसरा पर्यायही पुढे आला आहे. तो म्हणजे हिंजवडी व परिसरातील गावांसाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करणे. पश्चिम पुणे महापालिका किंवा हिंजवडी महापालिका या स्वरूपातील नवीन शहर प्रशासन निर्माण केल्यास, या भागातील झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणावर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवता येईल. तसेच या भागात आयटी कंपन्या, मोठ्या निवासी वसाहती, उद्योग आणि गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या ती सक्षम महापालिका ठरू शकते, असा दावा करण्यात येत आहे.

सध्या हिंजवडी-माण-मारुंजी व लगतच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या लोकसंख्येचा विचार करता या जागतिक दर्जाच्या आयटी पार्कचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी या भागाकरिता स्वतंत्र महापालिका किंवा स्वतंत्र प्राधिकरण नियुक्त करावे, जेणेकरून या भागाचा झपाट्याने, नियोजनबद्ध विकास करता येईल. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमधील वाकड, पुनावळे, ताथवडे, किवळे अशा अनेक भागात अद्याप परिपूर्ण विकास नाही. मग आणखी गावे घेऊन महापालिका या गावांना न्याय देऊ शकणार का ? -अर्चना आढाव, सरपंच, माण
 

महापालिकेत समावेश करावा, याबाबत ग्रामपंचायतीने ठरावही करावा. सांगवडेच्या दळणवळणासाठी प्रमुख असलेल्या पवना नदीवरील पूल टाकण्याचे काम महापालिका करत आहे. त्यामुळे सांगवडे गावाची कनेक्टिव्हीटी पिंपरी-चिंचवडशी जास्त जोडली जाणार आहे. नवीन महापालिका किंवा पिंपरी-चिंचवड महापालिकेत गावांचा समावेश करावा, याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. - रोहन जगताप, सरपंच, सांगवडे

हिंजवडीचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करावा, अशी नागरिकांची मागणी किंवा जोर कोठेच नाही. सद्यःस्थितीत आहे त्या नागरी सुविधा व्यवस्थित उपलब्ध करून द्याव्यात. अपुरी पाणीपुरवठा यंत्रणा, वाहतुकीचा प्रश्न, विनाखड्ड्यांचे रस्ते, आरोग्य, साफसफाई यंत्रणा, उद्यानांची देखभाल, गृहनिर्माण संस्थेचे व इतर अनेक प्रश्न प्राधान्याने सोडवावेत, त्यानंतर इतर गावांच्या समावेशाचा विचार व्हावा. - मयूर जैस्वाल, वरिष्ठ उपाध्यक्ष, काँग्रेस 

हिंजवडी परिसर पिंपरी-चिंचवड महापालिकेशी जोडलेला आहे. आयटीमध्ये काम करणारे बहुतांशी आयटीयन्स पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत. हिंजवडीचा महापालिकेेत समावेश अथवा नव्या महापालिकेत समावेश करावा, जेणेकरून तेथील मूलभूत समस्या तातडीने सोडवल्या जातील. - सचिन लोंढे, सदस्य, पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी

Web Title: Will seven villages including Hinjewadi be included in the Municipal Corporation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.